‘वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, आपल्यासाठी योग्य क्षेत्र कसे ओळखायचे? इथपासून ते परीक्षेचा अभ्यास, निवडलेल्या क्षेत्रातील आव्हानांचा सामना करताना ताणाला कसे सामोरे जायचे..’ अशा करिअर निवडतील विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची संधी ‘लोकसत्ता’ ने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम मंगळवारी (८ डिसेंबर) होणार आहे.
करिअरची निवड करताना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमासाठी ‘रोबोमेट’ ही संस्था सहप्रायोजक आहे. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. कल चाचणी म्हणजे काय, ती कधी करावी, त्याच्या निष्कर्षांतून आपली वाट निश्चित कशी करावी अशा विविध मुद्दय़ांवर ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेच्या नीलिमा आपटे मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील संधी, त्याची प्रवेश प्रक्रिया, नवी क्षेत्र अशा विविध मुद्दय़ांवर प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. अगदी दहावी, बारावीच्या परीक्षांचा ताण, प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना येणारा ताण, करिअरच्या निवडीनंतर त्या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देताना येणाऱ्या ताणाचा सामना कसा करावा या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके संवाद साधणार आहेत.
‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम मंगळवारी (८ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता पेरूगेट येथील भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या ठिकाणी तासभर आधी मिळणार आहेत.