करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत संमिश्र सूर व्यक्त होत आहे. काही विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र परीक्षा रद्द करणे हे कधीही शक्य असल्याने परिस्थिती सुधारण्याची सीबीएसईने थोडी वाट पाहायला हवी होती, ऑनलाइन परीक्षेचा विचार करायला हवा होता. मात्र परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाने वर्षभर कष्ट के लेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

सीबीएसईकडून ४ मे ते ७ जून या कालावधीत दहावीची, ४ मे ते १४ जून या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष सीबीएसईकडून जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यातील राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येत होती.

सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द के ल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे पालक, शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा गुणांपेक्षा आत्मविश्वासासाठी महत्त्वाची असते. थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत करिअर समुपदेशक के दार टाकळकर यांनी मांडले. तर, परीक्षा रद्द करण्यापेक्षा काही काळ पुढे ढकलायला हवी होती, ऑनलाइन परीक्षेचाही विचार करणे शक्य होते. वर्षभर अभ्यास के ल्यानंतर परीक्षा रद्द होणे निराशा करणारे आहे, असे काही विद्यार्थी-पालकांचे म्हणणे आहे.

करोना काळात ऑनलाइन पद्धतीने वर्षभर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया झाली. शाळांना वेगवेगळ्या पातळीवर विशेष काम करावे लागले. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साहित्य घरी देऊन प्रात्यक्षिके ही करून घेतली. चाचणी परीक्षाही घेण्यात आल्या. त्यामुळे वर्षभर कष्ट के लेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाने नक्कीच नुकसान होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईने थोडी वाट पाहायला हवी होती. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नाराजी आहे.

– मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला