सर्वसामान्यपणे एका गटातील प्राण्याला एकाच प्रकारचे अवयव असतात. पण नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात नुकतीच एक कोंबडी सापडली आहे. आता कोंबडी म्हटल्यावर तिला दोन पाय, एक चोच, डोक्यावर तुरा, दोन डोळे असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण निगडी परिसरात असणाऱ्या एका चिकन सेंटरमध्ये चक्क चार पायाची कोंबडी आढळली आहे. या कोंबडीला चार पाय असल्याने तन्वीर नाव असलेल्या या चिकन सेंटरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चार पायांची ही कोंबडी कशी दिसते हे पाहायला बघ्यांची एकच गर्दी झाली होत आहे.

कुतबुद्दीन होबळे याचे मागील ३० वर्षांपासून चिकनचे दुकान आहे. त्यांचा मुलगा तन्वीरही आता त्यांच्यासोबत हाच व्यवसाय करतो. एकदिवस सकाळी नेहमीप्रमाणे तन्वीरने कोंबड्या कापायला घेतल्या. त्यात एका कोंबडीला कापत असताना तिला चार पाय असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही गोष्ट त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावेळी कुतबुद्दीन यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. मात्र त्यांनी प्रत्यक्ष या कोंबडीला पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मग अतिशय कमी कालावधीत ही गोष्ट संपूर्ण शहरात पसरली.

मग कापायला आणलेली ही कोंबडी काहीशी वेगळी असल्याने तिला न कापण्याचे होबळे पिता-पुत्रांनी ठरवले. आता ते तिची काळजी घेत असून या कोंबडीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ४ पाय असल्याने या कोंबडीबाबत विशेष उत्सुकता असल्याने काहींनी या कोंबडीला काहीशा जास्त किंमतीत विकत घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र आपण या कोंबडीला विकणार नसून जोपर्यंत ती जगेल तोपर्यंत तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणार असल्याचे चिकन सेंटर मालक कुतबुद्दीन यांनी सांगितले.