गेल्या पावणेदोन महिन्यांपासून पैशांसाठी नागरिकांना रांगेत उभे राहवे लागत आहे. नागरिकांना तूर्त काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी बँकेतून पैसे काढण्यासाठी मर्यादा आहेतच. ग्राहकांकडे मर्यादित प्रमाणातच रोकड येत असल्यामुळे बाजारांमधील खरेदीही मर्यादितच होत आहे. गेल्या पन्नास दिवसांपासून नागरिकांची पैशांसाठी धावपळ सुरू आहे. पन्नास दिवसांनंतर व्यावसायिकांचे व्यवसाय ५० टक्क्य़ांवर स्थिरावले आहेत.

मात्र, अजूनही ग्राहकांकडे मुबलक पैसे नसल्यामुळे ग्राहक बाजारपेठेत मर्यादित प्रमाणातच खरेदी करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यवसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. बँकांकडे मर्यादित चलन येत असल्यामुळे बँककर्मचारी ग्राहकांना हवे तेवढे पैसे देत नाहीत. एटीएम केंद्रांमधून दिवसाला साडेचार हजार रुपये काढण्याची मर्यादा असली, तरी प्रत्यक्षात तेवढे पैसे काढता येत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. बँकेमध्येही चलनाचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे पन्नास दिवसांनंतरही व्यवहार सुरळीत झालेले नाहीत, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

नोटबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही पैशामुळे अडचणी येत आहेत. एटीएममध्ये पुरेसे पैसे मिळत नाहीत. आमच्याकडे कामासाठी असणाऱ्या कामगारांना आम्ही रोख पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे हाल होत आहेत. व्यवसाय निम्म्याने कमी झाला आहे. थोडीफार परिस्थिती सुधारली असली, तरी परिस्थितीत पूर्णत: सुधारणा झालेली नाही.

-श्रीरंग चव्हाण, शिवचांगभलं हॉटेल, थरमॅक्स चौक चिंचवड

नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतर व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे. पन्नास दिवस झाल्यानंतर आता तरी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. व्यवसायावर परिणाम झाला आहे. फक्त सुट्टय़ा पैशाची चणचण थोडी कमी झाली आहे.बाकी सर्व परिस्थिती सारखीच आहे. अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.

-मनोज जेटवानी, शिवशंकर कोल्ड्रिंक अ‍ॅन्ड टी हाऊस, पिंपरी

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर पैसे मिळण्याबाबत काहीही फरक पडलेला नाही. व्यवसायावर परिणाम झाला आहे. अजूनही सुरळीत व्यवहार होत नाहीत. बँकेत मुबलक प्रमाणात पैसे नसल्यामुळे आमच्यासारख्या छोटय़ा व्यावसायिकांना कोणत्याही वेळी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मिळत नाहीत. ग्राहक धनादेशाद्वारे व्यवहार करण्यासाठी नकार देतात.

-सदाशिव जोगदंड, रेडियम व्यावसायिक, पिंपरी

असे सांगितले जात होते, की पन्नास दिवस द्या. परंतु पन्नास दिवसांनंतरही काही फरक पडला नाही. पानटपरीवर एक ते दहा रुपयांपर्यंतच्या वस्तू विकल्या जातात. काही ग्राहक दोन हजाराची किंवा पाचशे रुपयांची नोट घेऊन येतात. त्यांना देण्यासाठी सुटे पैसे नसतात. त्यामुळे व्यवसाय निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. घरचा खर्च भागवणे मुश्किल झाले आहे.

-मुन्ना ऊर्फ महमद शेख, पानटपरी चालक, पिंपरी

नोटाबंदीनंतर व्यवसायावर परिणाम झाला आहे. मुलांचे शाळेचे शुल्क भरण्यासाठीही पैसे मिळत नाहीत. ग्राहक पे टीएम किंवा स्वाइप यंत्र आहे का असे विचारतात. छोटय़ा व्यावसायिकांना अशा सुविधा वापरणे परवडत नाही. त्यामुळे ५० दिवस होण्याची वाट पाहिली. परंतु ५० दिवसांनंतरही परिस्थिती काही सुधारली नाही.

-रामदास बोत्रे, कॅसेट विक्रेता

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर २५ टक्के व्यवहार सुधारला आहे. मात्र, व्यवसाय ५० टक्के कमी झाला आहे. डेबिट कार्डचा वापर करून होणाऱ्या खरेदीवर व्यवसाय तग धरून आहे. रोखीचे व्यवहार कमी होत आहेत. मात्र, सामान्य नागरिकांकडे डेबिट कार्ड नसते. त्यामुळे छोटे ग्राहक कमी झाले आहेत.

-मुकेश लुनिया, सराफ, पिंपरी