उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; ‘रुग्णालयांमधील गर्दी आवरा, प्राणवायूची बचत करा’

पिंपरी  : पिंपरी पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या भोसरी, आकुर्डी पिंपरी आणि थेरगाव येथील विभागीय रुग्णालयांची प्रलंबित कामे

तातडीने पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने तयार झाल्यास करोनाबाधितांसाठी नव्याने मोठे करोना काळजी केंद्र (जम्बो कोविड सेंटर) उभारण्याची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले.र्

पिंपरी -चिंचवडच्या करोनाविषयक सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी पवारांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आयुक्त राजेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते. करोना रुग्णवाढीचा दर, मृत्युदर, प्राणवायू सज्ज खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटा, एकूण खाटांचे व्यवस्थापन, शववाहिका-रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन आदींची माहिती वैद्यकीय अधिकारी क्रिस्टोफर झेव्हियर यांनी पवारांना दिली. रुग्णालयांमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि इतर व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण आणावे, शक्य होईल तिथे प्राणवायूची बचत करावी, अशा सूचनाही पवारांनी बैठकीत केल्या.

महापौर ढोरे यांनी, शहरातील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा पुरेसा पुरवठा करावा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे, शहरासाठी आवश्यक करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.