आगामी निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून पक्षाची भूमिका आक्रमक व प्रभावीपणे मांडू शकतील, असे वक्ते तयार करण्याचा कार्यक्रम काँग्रेसने हाती घेतला असून त्यासाठी २७, २८ एप्रिल रोजी बालेवाडी येथे राज्यव्यापी वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बालेवाडी येथील वक्ता शिबिराची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळात काँग्रेसची भूमिका प्रभावी व आक्रमकपणे मांडणारे वक्ते तयार व्हावेत, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री कपील सिब्बल, खासदार सचिन पायलट, संदीप दीक्षित, उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध आघाडय़ांचे पदाधिकारी असे मिळून दीड हजार जण या शिबिरात उपस्थित राहणार असून शिबिर संयोजनाची जबाबदारी शहर व जिल्हा काँग्रेसकडे देण्यात आली आहे. त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यासाठी काँग्रेस भवनात तयारी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. पक्षसंघटनेबरोबरच पक्षाच्या अन्य आघाडय़ा बळकट करण्याच्या दृष्टीनेही शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.