बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिला डॉक्टरला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.

पुण्यातील विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक सेंटर नावाचे हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी डॉ. मकरंद रानडे आणि डॉ. नीना मथराणी हे मिळून गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती तथापी संस्था आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेला मिळाली होती. त्यानुसार राज्य कुटुंब कल्याण मंडळाला सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एका जोडप्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉ. रानडे यांनी नऊ हजार रुपये घेऊन त्यांना डॉ. मथरानी यांच्या सोनोग्राफी केंद्रात पाठवले. या ठिकाणी कोणताही अर्ज भरून न घेता तपासणी करण्यात आल्याची बाब उघड झाली. त्यानंतर डॉ. रानडेचे हॉस्पिटल आणि डॉ. मथराणी यांचे सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले. तसेच त्यांचा परवाना देखील जप्त करण्यात आला. त्याच दरम्यान मकरंद रानडे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान डॉ. नीना मथराणी यांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.