महापालिकेत ठेकेदारीचा परवाना आणि नोकरीचे आमिष दाखवून महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने बारा लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह चौघांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शर्मिला अनिल मगर (वय ४५, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, गुरूवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून लालासाहेब संभाजी तडाखे, मंगला लालासाहेब तडाखे, रेश्मा लालासाहेब तडाखे, रजणी लालासाहेब तडाखे (रा. सर्व पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसाहेब तडाखे हे महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला आहेत. मगर व तडाखे यांची एका मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तडाखे यांनी मगर यांना त्याच्या मुलास महापालिकेचे ठेकेदारी करण्याचा परवाना मिळवून देतो. तसेच, लहान मुलास महापालिकेत शिपाई म्हणून नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून वेळोवेळी बारा लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यांच्या मुलास ठेकेदारीचा परवाना आणि नोकरी न लावता फसवणूक केली. त्यांना इतर आरोपींनी मदत केली म्हणून गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. गेंगजे हे अधिक तपास करत आहेत.