९० टक्के  सायकलस्वारांकडून मार्गांऐवजी नाइलाजाने रस्त्यांचा वापर; सर्वेक्षणातून बाब उघड

पुणे : सायकलस्वारांची संख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात सायकल मार्ग विकसित करण्यात महापालिके ला अपयश आल्यामुळे सायकलमार्गांचा वापरही अत्यल्प होत असल्याचे चित्र आहे. सायकल मार्गांचा के वळ १० टक्के  सायकलस्वारांकडून वापर होत असून मार्गांअभावी ९० टक्के  सायकलस्वारांना भर रस्त्यातूनच सायकल चालवावी लागत असल्याचे निरीक्षण पुढे आले आहे.

सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट  (एसपीटीएम) या संस्थेच्या वतीने कोथरूड, कर्वेनगर, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता येथील सहा ठिकाणच्या सायकल मार्गांचे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत सलग चौदा दिवस सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी ९.३० ते ११.३०, दुपारी १ ते ४ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा विविध टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत किती सायकलस्वार सायकल मार्गांचा वापर करतात, किती सायकलस्वार प्रत्यक्ष रस्त्यांचा वापर करतात, याची सायकलस्वार निहाय मोजणी करण्यात आली. त्या वेळी अवघे दहा टक्के  सायकलस्वार सायकल मार्गाचा वापर करत असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले.

जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्त्यावरील सायकल मार्गांपेक्षा कोथरूड व कर्वेनगर येथील सायकल मार्गांचा सायकलस्वारांकडून तुलनेने किं चित जास्त वापर असल्याचेही आढळून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांचे महापालिकेने अर्बन डिझाईन गाईडलाईन्सनुसार रुंदीकरण के ले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि सायकल मार्ग विकसित करण्यात आले आहेत. मात्र पादचारी सायकल मार्गावरूनही जात असून सायकल मार्गांवर झालेली अतिक्रमणेही सायकल मार्गांचा वापर कमी होण्यास कारणीभूत ठरली आहेत. यामध्ये महावितरणाच्या विद्युत जनित्रांचेही अडथळे आहेत. तसेच सायकल मार्गांमध्ये सलगता नसल्यामुळे सायकल स्वारांना रस्त्यावरून सायकल चालवावी लागत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

सायकल मार्गांची सद्य:स्थिती

महापालिके ने सायकल एकात्मिक आराखडा तयार केला होता. त्याअंतर्गत ४७० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले. स्वतंत्र सायकल विभागाची स्थापना,  सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्याशिवाय प्रचार आणि प्रसार, देखरेख आदी प्रमुख बाबींचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या आराखड्यानुसार सायकल मार्गांचे जाळे उभारण्यात महापालिके ला अपयश आल्याचे चित्र आहे. महापालिके ने गेल्या तीन वर्षात अवघे २५ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित के ले आहेत. तर के ंद्राच्या तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) ९० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग काही वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले. त्यामुळे शहरात सद्य:स्थितीमध्ये ११५ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग आहेत.

सायकल मार्गांचा वापर एवढा कमी का आहे, या कारणांचा महापालिके ने शोध घेणे अपेक्षित आहे. सायकल मार्गांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना के ल्यास वापर वाढेल आणि उत्तरोत्तर सायकलीं मार्गांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढेल.

– हर्षद अभ्यंकर, संचालक, एसपीटीएम