संगणक अभियंत्याला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याची धमकी देऊ न त्याच्याकडून ७५ हजारांची खंडणी दोघा पोलीस शिपायांनी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीखोर पोलीस शिपायांना बंडगार्डन पोलिसांनी गजाआड केले आहे.
राजेश गणपती नाईक (वय ३८ रा. जगतापनगर, वानवडी) आणि दीपक पांडुरंग रोमाडे (वय ३८, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) अशी अटक केलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. संगणक अभियंता सौरभ श्यामल राय (वय ३७, रा.विमाननगर) यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस शिपाई नाईक आणि रोमाडे हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. सौरभ राय हे बंगळुरु येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोक री करतात. राय हे बुधवारी (१६ फेब्रुवारी) मित्रांसोबत पुणे स्टेशन परिसरातील एका उपाहारगृहात जेवण करण्यासाठी आले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  ते  मोटारीतून विधानभवन रस्त्याने घरी निघाले होते. त्या वेळी एका महिलेने त्यांना मोटार थांबविण्यास सांगितले. लष्कर परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ सोडण्याची विनंती तिने राय यांच्याकडे केली.
राय यांनी इस्कॉन मंदिराजवळ मोटार थांबविली. तेव्हा त्या महिलेने त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास आरडाओरडा करण्याची धमकी राय यांना दिली. राय यांनी तिला पोलीस चौकीत जाऊ, असे सांगितले. ती महिला तेथून निघून गेली. त्यानंतर राय तेथून विमाननगर येथे आले. सोसायटीत मोटार लावत असताना पोलीस शिपाई नाईक आणि रोमाडे हे तेथे आले. आम्ही पोलीस चौकीतून आलो आहोत. तुमच्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिली असून तुम्हाला पोलीस चौकीत यावे लागेल, असे त्यांनी राय यांना सांगितले. त्यानंतर राय यांच्या मोटारीत दोघे जण बसले आणि विमाननगर पोलीस ठाण्यात जायचे आहे, असे नाईक आणि रोमाडे यांनी सांगितले. विमाननगर येथील एका एटीएम सेंटरमध्ये राय यांना नेले. आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करायला आवडणार नाही. ३५ हजार रुपये द्या, पैसे न दिल्यास तुम्हाला खुनाच्या गुन्ह्य़ात अडकवतो, अशी धमकी या दोघांनी राय यांना दिली. राय यांनी त्यांना ३५ हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यांना ३५ हजार रुपये दिले.
नाईक आणि रोमाडे यांनी पैसे घेण्यास नकार दिला आणि वरिष्ठ आधिकारी एक लाख दहा हजार रुपये मागतात, असे सांगितले. एकावेळी एटीएममधून एवढे पैसे निघत नाहीत. उर्वरित पैसे नंतर देतो, असे राय यांनी सांगितले.त्यानंतर राय यांनी त्यांच्या परिचित असलेल्या वकिलाशी संपर्क साधून याघटनेची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी राय यांना नाईकआणि रोमाडे यांनी विधान भवननजीक बोलाविले.त्या वेळी राय यांनी त्यांच्या वकिलासोबत बोलण्यास सांगितले. तेथून नाईक आणि रोमाडे पसार झाले. राय यांनी तातडीने बंडगार्डन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून राय यांना धमकाविणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.