|| भक्ती बिसुरे

‘डाएट फूड’ देणाऱ्या हॉटेल्सना पुणेकरांची मोठी पसंती

पट्टीचे खवय्ये असलेल्या पुण्यामध्ये जगातील कोणत्याही व्यंजनाची उपलब्धता आहे. दक्षिण भारतीय, इराणी, युरोपिअन, चायनीज, थायी, इटालियन आदी सर्वच चवींना सरावलेल्या खाद्यप्रेमींकडून आता आरोग्यदायी आहाराची मागणी वाढत असून हॉटेलचालकच त्यासाठी आहारतज्ज्ञांना पाचारण करीत आहेत. या तज्ज्ञांकडून ग्राहकांना हवा तसा अधिक प्रथिने, कमी कबरेदके असलेला तसेच जास्त कॅलरीयुक्त आहार मेनूमधून आखून देण्यात असल्याने या आरोग्य संवेदनशील हॉटेल्समध्ये भोजनाचा कल वाढू लागला आहे.

खास किंवा विशिष्ट पदार्थ मिळणारी अनेक हॉटेल्स पुणेकरांच्या परिचयाची आहेत. त्या त्या ठिकाणांचा ठरलेला ग्राहकवर्गदेखील आहे. मात्र आहार आणि व्यायाम याबद्दल सजग होत असलेल्या ग्राहकांच्या संख्येबरोबरच त्यांना आरोग्यासाठी उपयुक्त आहार पुरवणाऱ्या हॉटेल्सचा ‘ट्रेंड’ शहरात वाढताना दिसून येत आहे. या हॉटेलमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

‘डाएट’ म्हणजे उपासमार हा सामान्य समज खोडून काढत स्वादिष्ट तरीही पौष्टिक पदार्थाची रेलचेल असलेली अनेक हॉटेल्स गेल्या दोन वर्षांत सुरू झाली आहेत.  हॉटेल व्यवसायात दाखल होताच आम्ही काळाला अनुसरून ‘डाएट फूड’ पुरवणारे हॉटेल सुरू  करण्याचा निर्णय घेतला. २५ ते ४० वर्षे वयोगटातील जिममध्ये जाऊन व्यायाम करणारे आणि ५५ वर्षांवरील मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेले नागरिक आमचे ग्राहक असल्याचे  कोरेगाव पार्क येथील ‘स्लीमकार्ट’ हॉटेलचे वरुण जालान यांनी सांगितले. ते स्वत: आहारतज्ज्ञ असून त्यांचे बंधूही या व्यवसायात आहेत. ‘डाएट’चा आहार म्हणजे केवळ कच्च्या भाज्या असा सर्वसाधारण समज असतो, मात्र सॅलड, पराठा, सूप असे अनेक चविष्ट पदार्थ आम्ही हॉटेलमध्ये पुरवतो असे त्यांनी सांगितले.

मॉडेल कॉलनीतील ‘बिस्ट्रो न्यूट्रीफूड’चे नितीन भोसले म्हणाले, आम्ही आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेनू तयार केला आहे. सॅलड, रोल, पिझ्झा, पास्ताचे पौष्टिक पर्याय आम्ही पुरवतो. डाएट करताना गोड पदार्थ वज्र्य असे अनेकांना वाटते, मात्र त्यांच्यासाठी ‘शुगर फ्री’ गोड पदार्थाचा स्वतंत्र मेनू आम्ही पुरवतो.

फिट फूडच्या मौली गुप्ता म्हणाल्या, किटो डाएट, लो कार्ब डाएट अशा संकल्पना आरोग्याविषयी जागरूक नागरिकांमध्ये रुजत आहेत. मात्र अनेकांना त्या डाएटच्या प्रकारचे पदार्थ रोज करणे शक्य नसते. आयटीमध्ये काम करणाऱ्या, घरापासून दूर राहणाऱ्या तरुण- तरुणींची गरज ओळखून ‘फिट फूड’ हा व्यवसाय सुरू केला. डाएटमधील बदलांप्रमाणे ग्राहक ‘फिट फूड’ला माहिती देतात आणि तसा आहार त्यांना घरी किंवा कार्यालयात पोहोचवला जातो. प्रीती देशमुख यांनी ‘फूड मॅटर्स’ या नावाने डाएट फूड बनवण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. चार आहारतज्ज्ञ आणि शेफ यांची मदत घेऊन सुरू  केलेल्या या व्यवसायाचे खेळाडू आणि अ‍ॅथलिट ग्राहक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

यात काय असते ?

  • सॅलड, पराठा, सूप, सॅलड, रोल, पिझ्झा, पास्ता यांना ग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या शरीरस्थितीनुसार चविष्ट बनविले जाते.
  • मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र आणि आवश्यक तो मेनू आखून दिला जातो.
  • शुगर फ्री’ गोड व्यंजनेही खास तयार केली जातात.
  • खेळाडू आणि घरापासून दूर राहणाऱ्या बॅचलर्ससाठी खाद्यतज्ज्ञ आणि शेफ एकत्र येऊन आहाराची आखणी करतात.