महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ‘पुलं’चे चित्र, झाड, हाताचे ठसे, सध्याच्या बहुचर्चित सैराट चित्रपटाच्या नावाचे सुलेखन, मनातील भावना आणि विचार असे सारे छत्रीवर उमटले. ‘छत्री रंगवा’ या उपक्रमात लहान मुला-मुलींपासून ते आजी-आजोबांपर्यंतच्या विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला.
पुलंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित पुस्तकांच्या मान्सून सेलचे उद्घाटन छत्री रंगवा उपक्रमाने झाले. चित्रपतंग समूहाचे श्रीनिवास आगवणे यांनी छत्रीवर पुलंचे चित्र रंगवून या उपक्रमाचे उद्घाटन केले. ‘मी येतोय.. सैराट होऊन.. पावसाळा’ आणि आरती प्रभू यांचे ‘ये रे घना’ या कवितेच्या ओळी रंगविण्यात आल्या. ही छत्री वाचकाला भेट देण्यात आली. झाडांच्या बिया असलेले बुकमार्क विनामूल्य देण्यात आले. अक्षरधारा बुक गॅलरी येथे ३१ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ या वेळात सुरू राहणाऱ्या या मान्सून सेलमध्ये काही पुस्तके सवलतीच्या दरात, तर काही पुस्तके निम्म्या दरात उपलब्ध होणार आहेत.