जास्त पैसे घेऊन थिएटर कमी दिल्याच्या रागातून कलाकारांनी वितरकांना मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातली जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. ‘कॉलेज डायरी’ या सिनेमातील कलाकारांनी वितरकांविरोधात आणि वितरकांनी कलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कॉलेज डायरी हा सिनेमा 8 मार्चला प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटर्समध्ये दाखवण्याचे आश्वासन वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर या दोघांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात हा सिनेमा फक्त 45 थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप कलाकारांनी केला. तसेच निर्माते अनिकेत घाडगे यांनीही हाच आरोप केला. याच रागातून चित्रपटातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना मारहाण केली.

वितरक योगेश गोसावी यांची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. तर दुसरीकडे निर्माते अनिकेत घाडगे यांनी लोकसत्ता ऑनलाईनला त्यांची बाजू काय आहे ते सांगितले.

काय म्हटले अनिकेत घाडगे?
100 थिएटर्समध्ये सिनेमा दाखवू या हिशोबाने वितरकांनी पैसे घेतले होते. मात्र शोची यादी वेळेवर दिली नाही. मी हा सिनेमा कर्ज काढून तयार केला आहे. ऐनवेळी 100 ऐवजी फक्त 45 थिएटर्समध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. त्यातही योग्य वेळेचे शो सिनेमाला मिळू शकले नाहीत. यासंदर्भात आम्ही वितरकांशी बोललो तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यातून हा सगळा प्रकार घडला असे घाडगे यांनी स्पष्ट केले.