डॉक्टरांनी ग्रामीण भागात काम करण्याची असलेली गरज, वैद्यकीय संशोधनातील वेगळी नशा, वैद्यक व्यवसायातील गैरप्रवृत्ती याबाबत विंचूदंशावरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्याशी संवाद साधण्याची संधी भावी डॉक्टरांना मिळाली. खेळण्या-बागडण्याच्या वयात कराव्या लागलेल्या कष्टामुळे करपलेले बालपण, शिक्षण घेण्यासाठी करावा लागलेल्या संघर्ष, वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यावर आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न या गोष्टींवरही बावस्कर मोकळेपणाने बोलले.
मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था आणि ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामीण भागात जाण्यास डॉक्टरांच्या असलेल्या नाराजीबद्दल बावस्कर म्हणाले, ‘डॉक्टर म्हणून तुम्हाला खरोखर काम करायचे असेल तर आपण कोणत्या वातावरणात काम करतो याची अडचण वाटायला नको. ग्रामीण भागात डॉक्टरला जो ‘रॉ डाटा’ मिळेल तो बी. जे. महाविद्यालयात कदाचित मिळणार नाही. जेव्हा तुम्ही डॉक्टरचा अॅप्रन घालता तेव्हा तुम्ही स्वत:चे नसता तुम्ही समाजाचे झालेले असता. देशाची सेवा करायची असेल तर ग्रामीण भागात जा. परदेशी गेलात तरी ज्ञान घेऊन परत या.’
डॉक्टरने संशोधनासाठी प्रयत्न करायलाच हवेत, असे सांगून ते म्हणाले,‘ आपले प्रसिद्ध झालेले संशोधन आपण प्रथम वाचतो ती ‘किक’ निराळीच असते. त्यात एक वेगळी नशा आहे. संशोधन कमीत कमी खर्चात व्हावे. या देशात भरपूर पैशांमधून करायचे संशोधन लवकर होणार नाही.’

‘कट प्रॅक्टिस डॉक्टरांना शिकवली कुणी?’
बावस्कर विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले,‘डॉक्टरकीत ‘स्पॉन्सरशिप’ टाळा. आरामदायी जीवन कशाला हवे आहे? डॉक्टरला तर आराम अजिबात नको! ‘कट प्रॅक्टिस’ डॉक्टरांना कुणी शिकवली?, श्रीमंत होऊन काय करायचे आहे? साप चावल्यामुळे शरीर लुळे पडलेला माणूस उपचारांनंतर डोळे उघडून बोलतो तेव्हा स्वर्ग पृथ्वीवर आल्यासारखे वाटते!’
‘मलाही नैराश्य आले होते!’
नागपूरला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इतरांच्या चिडवण्यावरून आलेल्या नैराश्याबद्दल आणि त्यातून बाहेर येण्याबद्दल बावस्कर म्हणाले, ‘मुलांच्या चिडवण्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. स्वत:च्या खोलीवर जाणे अवघड वाटे, रात्र-रात्र झोप येत नसे. परंतु नंतर मी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली आणि  नैराश्य असतानाही औषधशास्त्र विषयात दुसऱ्या क्रमांकाचे गुण मिळवले. मानसिक आजाराकडे इतर आजारांसारखेच बघायला हवे. मेंदू आपल्या शरीराचा राजा आहे; पण मेंदूकडे कायम दुर्लक्ष केले जाते.’