लोकमान्य टिळक यांनी १९१५ साली लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘ई-साहित्य प्रतिष्ठान’ या संकेतस्थळाने हा ग्रंथ ई-पुस्तक रूपात डाऊनलोडिंगसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद देखील संकेतस्थळावर मिळणार आहे.
मंडालेच्या कारागृहात असताना टिळकांनी हा विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला.  www.esahity.com या संकेतस्थळावर हा एक हजार पानांचा ग्रंथ पाच खंडांमध्ये उपलब्ध झाला आहे. यातील प्रत्येक खंड दोनशे पानांचा आहे. तर ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद दोन खंडांचा आहे. यातील कोणताही खंड विनामूल्य डाऊनलोड करून वाचकांना तो आपल्या संगणकावर किंवा मोबाइल, टॅब्लेट आदींवर इंटरनेट सुरू नसताना देखील (ऑफलाइन) वाचता येणार आहे.
अक्षय तृतीयेला हा ग्रंथ उपलब्ध करून दिल्याची माहिती संकेतस्थळाच्या नवीन पुस्तक प्रकाशन विभागाचे सुनील सामंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘संकेतस्थळाच्या ई-पत्त्यावर केवळ एक ई-मेल पाठवून वाचकांना सदस्यत्व मिळते. सदस्य झाल्यावर दर महिन्याला तीन ते चार पुस्तके या वाचकांना ई-मेल द्वारे मिळतात. स्वत:च्या ओळखीच्या इतर दहा वाचकांचे ई-पत्ते कळवणाऱ्या वाचकांना व्हीआयपी सदस्यत्व मिळते व महिन्याला बारा पुस्तके ई-मेल द्वारे उपलब्ध होतात. ही दोन्ही सदस्यत्वे मोफत असून सदस्यत्व घेतले नाही तरीही संकेतस्थळावरून पुस्तके डाऊनलोड करण्याचा पर्याय खुला असतो.’’