ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे यांचे मत

वित्तीय व्यवसायातील गुन्हेगारी ही सर्वात मोठी आणि आभासी गुन्हेगारी आहे. असे गुन्हे केवळ भारतातच घडलेले नाहीत, तर प्रगत देशांतूनच याचे बीज फोफावले आहे. कायदे करून अशा गुन्ह्य़ांवर नियंत्रण राखता आले. मात्र, असे घोटाळे करणाऱ्या वित्तीय जगतातील धूर्तावर कारवाई होत नाही हे वास्तव आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वित्तीय घोटाळे घडू नयेत यासाठी व्यापक नियंत्रण व्यवस्थेतील साधने वाढवून त्याचा पुरेपूर फायदा करून घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘वित्त जगतातील धूर्त’  या विषयावर आपटे यांचे व्याख्यान झाले. हर्षद मेहता शेअर घोटाळा, एन्रॉन, कॉम्प्युटर असोसिएशन आणि वर्ल्ड डॉट कॉम या कंपन्यांच्या गैरव्यवहाराची माहिती देत आपटे यांनी विषयाची सोप्या मांडणीद्वारे उकल केली.

हर्षद मेहता शेअर घोटाळ्याचा दाखला देत आपटे म्हणाले, त्या काळात वित्तीय क्षेत्राची स्वतंत्र नियमावली होती. परंतु, सर्व व्यवहार कागदोपत्री असल्याने मेहता याने ‘बँकर नोट’ या सेवेचा पुरेपूर फायदा घेतला आणि गुडविलच्या नावाखाली कर्जरोख्यांचे व्यवहार परस्पर बँकांमध्ये केले. परंतु, अशा कोणत्याच बँका अस्तित्वात नव्हत्या. केवळ लोभापोटी नागरिकांनी अशा बँकांमध्ये पैसा गुंतवल्याने आमिषाचे प्राबल्य वाढले आणि घोटाळा उघडकीस आला. राजीव गांधी यांनी प्रत्येक वित्तीय क्षेत्रात संगणकीकरण अनिवार्य केल्याने काही प्रमाणात आळा बसला. कायद्यांची तीव्रता वाढवली तरी अशा गुन्ह्य़ांना पूर्णत: आळा घालता आला नाही. पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि एका खासगी कंपनीला दिलेल्या अमर्याद रकमेच्या कर्जामुळे चंदा कोचर यांना गमवावे लागलेले पद ही अशा स्वरूपाच्या घोटाळ्यांची ठळक उदाहरणे आहेत.

गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी धाक ठेवणारा सनदी लेखापाल हा राखणदार असतो. पण, तो केवळ तळे राखतो असे होत नाही. तर, तळ्याचा मालक होण्याचा प्रयत्न करतो. परदेशी लेखापालांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली असली तरी त्यांचे व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत, याकडे आपटे यांनी लक्ष वेधले.

लोभाला आवर घालणे गरजेचे

गेल्या दशकांत चीटफंड, दाम दुप्पट, अधिक व्याज, अशा विविध योजनांमध्ये लोकांनी डोळे झाकून विश्वासाच्या आधारावर मोठय़ा ठेवी ठेवल्या. परंतु, अशा प्रलोभन देणा?ऱ्या योजनांमधून नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे प्रथम नागरिकांनी लोभावर आवर घालावा, असे आवाहन प्रदीप आपटे यांनी केले. लोभाला आवर घालता आला नाही तर आहे तेदेखील गमावण्याची वेळ येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.