खाद्यतेलांची परदेशातून होणारी आयात यंदाच्या वर्षी टाळेबंदीमुळे ठप्प झाल्याने राज्यात खाद्यतेलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असून पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेले तेजीतच राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

खाद्यतेलांची मागणी पाहता ७० टक्के खाद्यतेले परदेशातून आयात केली जातात. देशात ३० टक्के खाद्यतेलांची निर्मिती केली जाते. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये देशात आठ लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आयातीचे प्रमाण ५० टक्क्य़ांनी घटले आहे.

टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाले असले, तरी अद्याप राज्यातील तेलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे कामकाज सुरळीत झाले नाही. त्यामुळे राज्यात सध्या खाद्यतेलांचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.

ते म्हणाले, पाम तेलाच्या डब्यामागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाच्या डब्याच्या दरात ५० रुपये, सोयाबीन तेलाच्या डब्याच्या दरात ३० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात किलोच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ आणखी काही महिने कायम राहणार आहे. शहरातील हॉटेल, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी असते. सूर्यफूल, शेंगदाणा तेलाला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते.

खाद्यतेलाचे दर

घाऊक बाजार   किरकोळ बाजार

(१५ लिटर डबा)  (एक लिटर)

पाम तेल    १३१० रुपये  ८० रुपये

सूर्यफूल १४४० ते १५५० रुपये १०७ रुपये

सोयाबीन १३०० ते १४७० रुपये ८८ रुपये

शेंगदाणा २१०० रुपये  १५६ रुपये

इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेटिना, युक्रेन या देशांतून खाद्यतेलांची आयात भारतात केली जाते. निर्बंध शिथिल झाले असले, तरी करोनामुळे आयात अद्याप सुरळीत झालेली नाही. पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेलांचा तुटवडा जाणवणार असून दरही तेजीत राहणार आहेत.

– रायकुमार नहार, खाद्यतेलाचे व्यापारी, मार्केट यार्ड भुसार बाजार