पुणे जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांत दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जापैकी ७८ उमेदवारांचे अर्ज सोमवारी छाननीमध्ये बाद झाले असून ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. कसबा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा अर्ज बाद झाला, तर भोसरीतून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या सुलभा उबाळे यांच्या अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर छाननी झाली. काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी विरोधी उमेदवारांच्या अर्जावर अक्षेप घेतल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. अर्ज पूर्ण न भरणे, प्रतिज्ञापत्र न सादर करणे, एबी फॉर्म जमा न करणे आदी कारणासाठी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. पुणे जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांतून ५६१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. या अर्जाची सोमवारी छाननी झाली. यामध्ये ७८ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. खडकवासला मतदार संघातून सर्वाधिक बारा अर्ज अवैध ठरले आहेत. तर, शिवाजीनगर मतदार संघात एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. कसबा मतदार संघातून राष्ट्रवादीचे काँग्रेसेचे प्रवक्ते अंकुश काकडे व विजय मारटकर यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. पर्वती मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष जगताप व खेड मतदार संघात राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील यांच्या अर्जावर अक्षेप घेण्यात आला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरविले. भोसरी मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रासंबंधित कागदपत्रांवर म्हणणे सादर करण्यास त्यांना उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उबाळेंच्या अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे.
मतदारसंघानुसार बाद झालेली अर्जाची संख्या –
जुन्नर ३, आंबेगाव ४, खेड ६, शिरूर ७, दौंड २, इंदापूर १, बारामती २, पुरंदर २, भोर ५, मावळ ८, चिंचवड ३, पिंपरी ४, भोसरी ३, वडगावशेरी ४, शिवाजीनगर ०, कोथरूड १, खडकवासला १२, पर्वती १, हडपसर ४, कॅन्टोमेन्ट ४ आणि कसबा पेठ २.