मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या रांगांनी गजबजलेली मतदान केंद्रे दुसऱ्या दिवशीही मतदानाच्या वातावरणातून बाहेर पडली नसल्याचेच चित्र आहे. शहरातील लहान-मोठय़ा शाळांनी गुरुवारी मतदान केंद्रांचे रूप घेतले होते. शुक्रवारीही या शाळांचा अवतार पाहता, त्या आपले रूप झटकून शाळेच्या रूपात आल्या नव्हत्याच.. कमी होती फक्त मतदारांची!
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदान केंद्रं असलेल्या शाळांची अवस्थेची पाहणी केली, तेव्हा ही मतदान केंद्रे अर्थात शाळा निवांत दिसल्या. बहुतेक शाळांच्या परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यामुळे शाळा सध्या बंद आहेत. त्यात मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी गुड फ्रायडेची सुट्टी आली. त्यामुळे शाळांची कार्यालयेही बंद होती. अर्थातच, या शाळांनी औट घटकेसाठी धारण केलेले मतदान केंद्राचे रूपही तसेच राहिले. अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या शाळांमध्ये तातडीने साफसुफीला सुरुवात झाली होती.
गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे शुक्रवारी अनेक शाळा उघडल्याच गेल्या नाहीत. प्रत्येक मतदान केंद्रात किती मतदार याद्या असणार आणि प्रत्येक यादीत किती मतदारांची नावे असणार याची माहिती देणारे ठसठशीत फलक मतदानाच्या दिवशी शाळांच्या बाहेर लावले गेले होते. आजही कित्येक ठिकाणी ते फलक तसेच आहेत. रात्री उशिरा कर्मचारी घरी गेल्यानंतर शिपायांनी वर्गाच्या बाहेर काढलेले बाक परत वर्गात नेऊन लावलेले नव्हते. वर्गामध्येही मतदानासाठी लावलेली टेबले तशीच होती. काही वर्गामध्ये तर निवडणूक कर्मचाऱ्यांनी खालेल्या न्याहरीच्या पाकिटांचा आणि जेवणाच्या ताटल्यांचा कचराही तसाच पडलेला दिसला. वर्गामधील फळ्यांवर लिहिलेली मतदानाची आकडेवारीही पुसली गेलेली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा मतदान सुरू होईल की काय असे वाटावे असेच शाळांचे रूप आहे.  
आपटे प्रशालेतील क्रीडा शिक्षक संतोष वाटाडे म्हणाले, ‘‘निवडणूक कर्मचारी रात्री काम संपवून उशिरा घरी गेले. त्यानंतर शाळा लगेच बंद करण्यात आली. आज सुट्टी असल्यामुळे शिपाई आलेले नाहीत आणि शाळाही उघडली गेली नाही. उद्या सगळे बाक जागच्या जागी जातील,’’
शामराव कलमाडी शाळेमध्येही बाक बाहेरच होते. वर्गामध्ये बराच कचरा पाहायला मिळाला. बिस्किटांचे पुडे, जेवणाच्या ताटल्या कोपऱ्यामध्ये तशाच पडल्या होत्या. ‘‘कर्मचाऱ्यांनी खाल्लेल्या गोष्टींचा कचरा कचरापेटीत टाकायचे कष्टही घेतलेले नाहीत. त्यामुळे आज वर्गात कचरा दिसतोय. एरवी आमची शाळा स्वच्छ असते,’’ असे शाळेतील ग्रंथपाल अश्विनी सरपोतदार यांनी सांगितले.
डी. आर. नगरकर प्रशालेमध्ये मुलांना बसण्यासाठी जी जागा असते तिथे स्लिपा वाटण्यासाठी बाकडी टाकण्यात आली होती. तीही दुसऱ्या दिवशी तिथेच होती. वर्गामधील हलवलेले बाक मात्र मतदानाच्या रात्रीच आपापल्या जागी गेलेले दिसले.
पर्वतीमधील नंदादीप प्रशालेमध्ये मात्र मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी शिस्तीत साफसफाईला सुरुवात झाली होती. चौकशी केल्यावर कळले, की हा कालावधी एरवी शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचा असतो. पण या वेळी नेमके मतदान आल्यामुळे हा मेळावा शाळेला घेता आला नव्हता. त्यामुळे मतदान झाल्या-झाल्या शाळा साफसूफ करून मंडप घालण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी सुरू केली होती.
‘व्हॉटस् अप’ही शांत शांत..
मतदानाचा दिवशी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आलेले ‘व्हॉटस् अॅप’ मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी अतिशय सुनेसुने भासत होते. मतदानाच्या दिवशी विविध ग्रुप्समधून मतदानाची आकडेवारी, त्यातील गैरप्रकार, गमतीजमती, हास्यविनोद, छायाचित्रे क्षणाक्षणाला माहिती पुरवली जात होती. त्यामुळे सोशल मीडियाचा हा प्रकार गुरुवारी खूपच वापरला गेला. मात्र, मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्यामानाने अगदीच तुरळक संदेश येत होते. येथेही वातावरण होते, शांत-निवांत!