डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार तयार केलेल्या हल्लेखोरांच्या रेखाचित्राशी मिळत्या-जुळत्या वर्णनाच्या पंधराहून अधिक व्यक्तींची चौकशी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास आता ठराविक व ठोस शक्यता गृहीत धरूनच करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आता १७ दिवस उलटले आहे. या प्रकरणातील हल्लेखोर पकडण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे. विविध ठिकाणी मूक मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांकडून सुरुवातीला या हत्येच्या प्रकरणात सर्व शक्यता व विविध बाबी लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हा तपास असला, तरी दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच विविध यंत्रणांकडून या तपासासाठी मदत करण्यात येत आहे. पोलिसांनी आजवरच्या तपासात विविध संघटना, त्यांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे काही व्यक्तींची चौकशी केली. मात्र, सध्या हा तपास काही ठराविक व ठोस शक्यता गृहीत धरून करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास काहीसा पुढे गेला असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना मिळालेल्या, साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दोन्ही हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. राज्यभरातील सराईत गुन्हेगारांची पडताळणी होत असतानाच हल्लेखोरांशी मिळत्या-जुळत्या वर्णनाच्या गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. रेखाचित्राशी साम्य असलेल्या पंधराहून अधिक व्यक्तींची आजवर चौकशी करण्यात आली आहे. रेखाचित्रानुसार चेहऱ्यात काही साम्य असलेल्या व्यक्तींचे चेहरे साक्षीदारांना दाखवून माहिती घेतली जात आहे.