पर्यावरणदिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे गुरुवारी शहरात विविध भागांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले. सामाजिक संस्था तसेच नगरसेवकांनीही त्यांच्या प्रभागांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम करून पर्यावरणदिन साजरा केला.
महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर सुनील गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर, नगरसेविका वैशाली बनकर, रंजना पवार, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, संदीप ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, बी. टी. कवडे पथ आणि हडपसर मधील उद्यानामध्ये हे कार्यक्रम करण्यात आले. या तीन मुख्य ठिकाणांसह अन्य ठिकाणी मिळून दोन हजार आठशे वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन होते. विविध सामाजिक संस्थांनीही त्यात सहभागी होत वृक्षारोपण केले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करावेत असेही आवाहन महापौरांनी बैठक घेऊन केले होते.
प्रभाग ३६ मध्येही कार्यक्रम
प्रभाग क्रमांक ३६ च्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले होते. बीएमसीसीच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवर आयोजित कार्यक्रमात अनेक ठिकाणी देशी वृक्ष लावण्यात आले. कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी परिसरातही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक अनिल राणे, मुकारी अलगुडे, उपायुक्त माधव जगताप, दरोडे-जोग प्रॉपर्टीजचे सुधीर दरोडे तसेच ग्रीनहिल संस्थेचे कार्यकर्ते आणि ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्याही विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात भाग घेतला.