पुणे : दिवसा काम करून रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट स्कूलमध्ये सायकल बँक स्थापन करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांचा प्रवासावर होणारा खर्च कमी होण्यासाठी, त्यांची शाळा-महाविद्यालयातील उपस्थिती वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकल बँकेतून सायकल पुरवली जाणार आहे.

परिवर्तन संस्था आणि बालन फाउंडेशन यांच्यातर्फे पूना नाईट स्कूलला २० सायकली भेट देण्यात आल्या आहेत.

या सायकलींची बँक करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात मिळून ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर अनेक आर्थिक अडचणी असतात. प्रवासावर होणारा खर्च त्यांना परवडत नाही. अशा गरजू विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यास त्यांचा तो खर्च कमी होईल, असे प्राचार्य अविनाश ताकवले यांनी सांगितले.

‘सायकल दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यात आली आहे.

त्याला दिलेल्या सायकलचा योग्य वापर होतो की नाही यावरही लक्ष ठेवण्यात येईल. ग्रंथालयाच्या धर्तीवरच ही सायकल बँक चालवली जाणार आहे. येत्या काळात सायकलची संख्या वाढवण्याचाही प्रयत्न आहे, जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडील ओढा वाढावा, त्यांची उपस्थिती वाढावी हा उद्देश आहे,’ असेही ताकवले यांनी नमूद केले.