एक्स्प्रेस हेल्थकेअर सभा चर्चासत्रात सार्वजनिक आरोग्याबाबत विचार मंथन

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे, मात्र असे असले तरी नवजात बालके आणि त्यांच्या मातांच्या आरोग्यासाठी विशेष परिश्रम घेऊन काम होण्याची गरज असल्याचे मत हैद्राबादस्थित डॉ. प्रकासम्मा यांनी गुरुवारी व्यक्त केले.

एक्स्प्रेस हेल्थकेअरतर्फे आयोजित हेल्थकेअर सभा २०१८ या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. भारत सरकारच्या पश्चिम विभागाचे डेप्युटी ड्रग कंट्रोलर पी. बी. एन. प्रसाद, एक्स्प्रेस हेल्थकेअरच्या संपादक विवेका रॉयचौधुरी, लेफ्टनंट जनरल सी. एस. नारायणन, कमांड रुग्णालयाच्या ब्रिगेडियर स्मिता देवरानी, डॉ. निलीमा क्षीरसागर, फिलिप्स इंडियाचे प्रणव चंदना उपस्थित होते. भारताचे सार्वजनिक आरोग्य बदलविषयक आराखडा या विषयावर १० मार्चपर्यंत या चर्चासत्रात विचार मंथन होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर भारतातील महिला आरोग्यविषयक योजनांचे यश या विषयावरील चर्चासत्राचेआयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. प्रकासम्मा म्हणाल्या, प्रगत प्राथमिक आरोग्य सुविधा नव्हत्या त्या काळापासून भारतात दाई आणि सुईणींची नेमणूक नवजात बालके आणि माता यांची काळजी घेण्यासाठी केली जात असे. आता दाई संस्कृती नाहीशी होत आहे हे खेदाचे आहे आणि सरकारला याची जाणीव करून देण्याची गरज आहे. ब्रिगेडियर स्मिता देवरानी म्हणाल्या, लष्करी रुग्णालयांमध्ये तसेच लष्कराच्या आरोग्य सेवेत मोठय़ा संख्येने महिला डॉक्टर आणि परिचारिकांची नेमणूक केली जाते. महत्त्वाच्या  कामगिरीवर आरोग्यविषयक सेवा पुरविण्याची संधी आणि प्रशिक्षण देखिल महिलांना दिले जाते. त्याच प्रमाणात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात देखिल महिलांना संधी मिळायला हव्यात. रॉयचौधुरी यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

पी. बी. एन. प्रसाद म्हणाले, औषध प्रतिबंधक योजना आणणे या कामाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनौषधींच्या वापराचे आवाहन केले असून जनौषधी आणि जेनेरिक औषधांच्या किमती नियंत्रित करणे तसेच औषधांची परिणामकारकता सुधारणे हे उद्दिष्ट ठेवून सरकारचे काम सुरू आहे.

लेफ्टनंट जनरल सी. एस. नारायणन म्हणाले, जगातील सर्वात मोठे लष्कर अशी ख्याती असलेल्या भारतीय लष्कराची आरोग्य यंत्रणा देखिल सक्षम आहे. ४३ हजार खाटांची १३२ रुग्णालये लष्करातर्फे  चालवली जातात. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळांवर पोहोचून आरोग्य सुविधा देण्यातही लष्करी आरोग्य सेवा कायमच आघाडीवर असते. ७००० डॉक्टर लष्कराच्या आरोग्य सेवेत कार्यरत असून लष्करी रुग्णालयांमार्फत सरकारी रुग्णालयांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम घेतले जातात. लष्करातर्फे जनौषधी आणि जेनेरिक औषधांचा वापरही मोठय़ा प्रमाणात केला जात आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, आरोग्य सेवेतील अडचणी, आरोग्य सेवा आणि प्रशासन अशा विविध मुद्दय़ांवर विश्लेषण करण्यात येणार आहे.