आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या संशोधन आणि विकास केंद्रात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. या ठिकाणी असणाऱ्या लाकडी साहित्य व रबराच्या कच्च्या मालामुळे काही वेळातच आग पसरली. तथापि, अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीच्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीमुळे परिसरात प्रचंड धूर पसरला होता, त्यामुळे काही प्रमाणात घबराट पसरली होती. त्याचप्रमाणे डोळे चुरचुरणे व उग्र वास येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या.