पुणे शहरातील कात्रज जवळील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये आग लागल्याची घटना आज घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आज दुपारच्या सुमारास आग लागली. अचानक आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कचरा प्रकल्प असल्याने काही क्षणात आगीचे आणि धुराचे लोळ आकाशात पसरले. त्यामुळे परिसरात धुर खूप दूर पर्यंत पसरला आहे. तसेच ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, ही आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आगीच्या घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.