आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे काम सुरू होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान प्रसंगी जिवाची बाजी लावतात. अशा पद्धतीने आपले कर्तव्य बजावताना प्राण गमवावा लागलेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्याबरोबरच दलाच्या कामकाजाची नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशातून अग्निशमन सप्ताहानिमित्त प्रदर्शन भरविले जाते. दलाच्या कामकाजाची ओळख करून घेण्याबाबत नागरिकांमध्ये औत्सुक्य आहे.
अग्निशमन सप्ताहानिमित्त संभाजी उद्यानात अग्निशमन दलाच्या विविध साहित्याचे आणि उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. बुधवापर्यंत (२० एप्रिल) सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी नि:शुल्क खुले आहे.
दुसऱ्या महायुध्याच्या काळात १९४४ मध्ये मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक यार्ड (सध्याचे मुंबई डॉक यार्ड) ब्रिटिश नौका एस. एस. फोर्टस्टीकिनला आग लागून दोन मोठे स्फोट झाले. त्या नौकेमध्ये कॉटन गठ्ठे, ऑईल साठा, लाकूड, सोने अशा वेगवेगळ्या साठय़ासह १३९५ टन दारुगोळा व २३८ टन अति विस्फोटके ठेवण्यात आलेली होती. सायंकाळी सव्वाचार वाजता नौकेस आग लागून झालेल्या स्फोटामध्ये डॉक यार्डच्या अग्निशमन जवानांसह मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले. आसपास काम करणारे आणि जवळपास राहणारे एकूण पाचशे नागरिक आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले. १३ जहाजे नष्ट झाली आणि अडीच हजारपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले.
कर्तव्यावर असताना नागरिकांची वित्त व जीवितहानी वाचविण्यासाठी करत असलेल्या आग विझविण्याच्या कामामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ६६ फायरमन जवानांच्या आणि त्यानंतर देशभर वेगवेगळ्या आग व आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. एरंडवणे अग्निशमन केंद्र येथील शौर्य स्तंभासमोर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. महानगरपालिका अग्निशमन दलाच्या भवानी पेठ येथील मुख्यालयामध्ये फ़ोलिन परेड झाली. रणपिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आणि कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन जवानांना मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.