02 December 2020

News Flash

साहित्य संमेलनाध्यक्ष झाले सधन!

पाच लाख रुपयांचा निधी जाहीर झाल्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्ष खऱ्या अर्थाने सधन झाले आहेत.

छायाचित्र प्रातिनिधिक

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रमुख. कोणतेही अधिकार नसलेला संमेलनाध्यक्ष हा ‘तीन दिवसांचा गणपती’ असे मानले जात असतानाच गेल्या सहा संमेलनांपासून ही संकल्पना कालबाह्य़ ठरली आहे. संमेलनाध्यक्षांना भाषेच्या प्रचार-प्रसारार्थ राज्यभर आणि बृहन महाराष्ट्रात जाता यावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे एक लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. यंदाच्या वर्षी तर, डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर झाल्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्ष खऱ्या अर्थाने सधन झाले आहेत.
पुण्यामध्ये झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यापासून संमेलनाध्यक्षांना प्रवास खर्चासाठी म्हणून एक लाख रुपयांचा निधी देण्याची प्रथा सुरू झाली. राज्यात आणि बृहन महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विविध वाङ्मयीन चळवळींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संमेलनाध्यक्षाने वर्षभर फिरणे अपेक्षित असते. त्यासाठी हा निधी वापरला जावा हाच त्यामागचा उद्देश होता. दभिंसह उत्तम कांबळे, वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. फ. मुं. शिंदे आणि डॉ. सदानंद मोरे अशा सहा संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी एक लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी काहींनी या निधीच्या विनियोगाचा हिशेबही महामंडळाला सादर केला आहे.
आगामी संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होत असून संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी तीनही संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. हा निधी वैयक्तिक स्वरूपाचा नसून त्याचा विनियोग कसा करावयाचा याचे स्वरूप लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2015 3:25 am

Web Title: fund amt increased upto 5 lacks for sahitya sammelan chairman
टॅग Fund
Next Stories
1 राष्ट्रवादी दरोडेखोरांचा पक्ष- – खासदार साबळे
2 नववर्षांचे स्वागत; पण पद्धत मात्र वेगळी..
3 विद्यापीठाच्या परिपत्रकांना महाविद्यालयांकडून केराची टोपली
Just Now!
X