जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी हिमायत बेग याच्यावरील सर्व आरोप बचाव पक्षाच्या वतीने फेटाळण्यात आले. घटनेच्या दिवशी बेग पुण्यात आलाच नव्हता, असा दावा बचाव पक्षाने केला आहे.
सरकारी वकील राजा ठाकरे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी युक्तिवाद करण्यात आला. बचाव पक्षाचे वकील ए. रहमान व कायनाश शेख यांनी विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात हा युक्तिवाद केला. उदगीर येथील नगरपालिका कार्यालयाजवळ असलेले ग्लोबल इंटरनेट कॅफे बेगचे नसून ते दुसऱ्याच व्यक्तीचे आहे. हे कॅफे बेगचेच असल्याचा कोणताही करारनामा पोलिसांनी न्यायालयात सादर केला नाही. कोणत्याही साक्षीदाराने यासीन भटकळ, फय्याज कागझी व बेग यांना उदगीर येथे एकत्रित पाहिल्याचे सांगितलेले नाही व त्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दहशतवादी विरोधी पक्षाने न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे या तिघांनी कॅफेत बॉम्ब तयार केल्याचा दावा खोटा आहे, असा युक्तिवाद  बचाव पक्षाकडून करण्यात आला.
बेग नोकरीच्या निमित्ताने २००८ मध्ये कोलंबोला गेला होता. मात्र, दहशतवादी विरोधी पक्षाने तो कट रचण्यासाठी तेथे गेल्याचे सांगितले आहे. त्याबाबतचा पुरावा सादर केलेला नाही, असेही बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.