सध्या नोकरीप्रधान शिक्षणपद्धती आहे. मात्र, ज्ञानावर आधारित शिक्षण मिळायला हवे, असे मत पुनरूत्थान समरसता गुरूकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. भारतात जवळपास ३० टक्के अडाणी आहेत आणि तितकेच ज्ञानीही आहेत, अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली.
चिंचवडला ‘भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धती, वर्तमान दृष्टी’ या विषयावर दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी पालिकेचे आयुक्त राजीव जाधव, बीएमसीसीचे माजी प्राचार्य अनिरूध्द देशपांडे, अ‍ॅड. सतीश गोरडे, महेश दाबक, विलास लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.
प्रभुणे म्हणाले, ‘भारतीय शिक्षण पध्दती विकसित केली पाहिजे. ती आधुनिक काळाशी सुसंगत असली पाहिजे. ज्ञानावर आधारित मांडणी हवी, प्रात्यक्षिकाद्वारे रोजचे शिक्षण दिले जावे. आपल्याकडे आजही विषमता दिसून येते. समाजातील अनेक घटक अशिक्षित राहिले आहेत. भटक्या जाती व जमातीतील मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. मात्र, ते ज्ञानापासून दूर नाहीत, असे ते म्हणाले. आधी शेतकरी आत्महत्या करत नव्हते, ते आताच तसे का करतात, अशी वेळ का आली, याचा विचार व्हायला हवा. काहीतरी चांगले केले पाहिजे, या भावनेतून शिवराज्याभिषेकाच्या दिवशी गुरूकुलम सुरू केले,’ असे त्यांनी नमूद केले.
शिक्षणमंत्र्यांची दांडी
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शिक्षण परिषदेचे उद्घाटन होणार होते. मात्र, ते आले नाहीत. राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर त्यांना मुंबईत थांबणे आवश्यक होते, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे संयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.