राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी निगडीत महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या जिल्हा कार्यकर्त्यांशी वार्तालाप करताना विद्यार्थी ते मंत्रिपदाचा प्रवास उलगडून सांगितला. शासनाने भरभक्कम तरतूद केली असताना आणि अनेक चांगल्या योजना राबवण्यात येत असतानाही त्या कागदावरच राहतात, त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
निगडीतील ज्ञानप्रबोधनी विद्यालयात सावरा यांच्या उपस्थितीत नरेंद्र पेंडसे यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, तेव्हा त्यांनी आपला जीवनप्रवास थोडक्यात विशद केला. या वेळी शांताराम इंदोरे, अंजली घारपुरे, संदीप साबळे, पुरुषोत्तम अनंतपुरे, कुलानंद ममगाई, अश्विन खरे, विलास हुल्याळ आदी उपस्थित होते.
सावरा म्हणाले, महाराष्ट्रातील ५९०९ गावांमध्ये सुमारे ४५ आदिवासी-वनवासी जनजमाती वास्तव्याला आहेत. त्यापैकी कातकरी हा समाज अजूनही मागासलेल्या अवस्थेत आहे. आदिवासींसाठी राज्य शासन दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करते. परंतु सार्वजनिक व व्यक्तिगत लाभांच्या अनेक योजना असूनही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचू शकत नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शासनाशी समन्वय ठेवावा. त्यामुळे कागदोपत्री असलेल्या योजना खऱ्या अर्थाने कार्यान्वित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी जिल्हय़ातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी विविध अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. कार्यक्रमाचे संयोजन विदुला पेंडसे, ऋषभ मुथा, सचिन जाधव, दाजी लांडे, अनिल वाघमारे, शिवाजी चौरे आदींनी केले.