‘एफटीआयआय’मध्ये (फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या संपाने ‘नव्वदी’ गाठली, तरीही त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने काहीही स्पष्ट हालचाली दिसून येत नाहीत. गुरुवारी संपाच्या ९१व्या दिवशी संस्थेतील तीन आंदोलक विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

१९ ऑगस्टला माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेला भेट दिल्यानंतर गेले काही दिवस संस्थेतले तंग वातावरण निवळले होते. मात्र ही समिती येऊन गेल्याला २० दिवस उलटूनदेखील समितीने काय अहवाल दिला किंवा त्या अहवालावर काही हालचाली सुरू झाल्या का, याबद्दलची काहीही स्पष्ट माहिती उजेडात आलेली नाही. परिणामी संस्थेतले वातावरण पुन्हा अस्थिर बनले असून अलोक आरोडा, हिमांशू शेखर आणि हिलाल सवाद या तीन विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून उपोषण सुरू केले आहे.
विद्यार्थी प्रतिनिधी विकास अर्झ म्हणाले, ‘विद्यार्थ्यांशी कोणत्याही प्रकारे थेट चर्चा करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत नाही. आता तीन विद्यार्थ्यांचा जीव पणाला लागला असून विद्यार्थ्यांची शासनाशी चर्चा होणे अत्यावश्यक आहे.’
विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत आपण मंत्रालयाला कळवले असून आपल्याला मंत्रालयाकडून काहीही सूचना मिळाली नसल्याचे संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी अशी जोखीम घेऊ नये, असे मी त्यांना सांगितले आहे. संस्थेतील डॉक्टरांनाही उपोषणाबाबत कळवण्यात आले असून ते वेळोवेळी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतील.’