मंदिरातील पुजाऱ्यांना दमा आणि श्वसनविकाराचा सर्वाधिक धोका असल्याचे एका शास्त्रीय अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अगरबत्ती आणि धूप यांचा धूर त्यांच्यासाठी हानिकारक ठरत असून तपासलेल्या  पुजाऱ्यांपैकी तब्बल २५ टक्के पुजाऱ्यांना हे आजार असल्याचे आढळले आहे.
पुण्यातील ‘चेस्ट रीसर्च फाऊंडेशन’च्या वतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी पुण्यातील मोठय़ा व प्रसिद्ध मंदिरांमधील ५० पुजाऱ्यांची निवड करण्यात आली होती. हे पुजारी सतत अगरबत्ती व धूप यातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात असतात. त्यांची ‘स्पायरोमेटरी’ चाचणी घेण्यात आली. श्वसननलिका किती प्रमाणात आकुंचन पावली आहे, हे या चाचणीद्वारे समजते. ती आकुंचन पावण्याचे मुख्य कारण धूर हेच असते. त्यामुळे पुजाऱ्यांवर धुराचा किती परिणाम झाला आहे हे समजले.
चेस्ट रीसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले, की अगरबत्ती किंवा धूप जाळल्यामुळे त्याच्या धुराचा त्रास होत असेल, याची लोकांना कल्पना नसते. दम्याचा विकार असलेल्यांना त्याचा त्रास होतोच, त्याचबरोबर या धुराच्या संपर्कात जास्त काळ आल्यावर इतरांनाही त्रास होतो.
दरम्यान, डासांना घालवण्यासाठी वापरण्यात येणारी मच्छरअगरबत्ती आणि विविध प्रकारच्या ‘मॅट’ सिगारेटपेक्षा घातक असतात. त्यातून निघणाऱ्या धुराचा विचार करता अशी अगरबत्ती किंवा मॅट रात्रभर जाळणे हे शंभर सिगारेट ओढण्याइतके हानिकारक आहे. त्यामुळे या गोष्टींऐवजी मच्छरदाणी वापरणे योग्य ठरते, असे डॉ. साळवी यांनी सांगितले.