देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन संबंधित अभ्यासक्रमांची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. के ंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन संबंधित विविध प्रकारचे अभ्यासक्रम, या क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यापीठांच्या वार्षिक परिषदा आदी माहितीचा समावेश असलेला सर्वसमावेशक ‘डेटाबेस’ तयार करण्यात येत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने या बाबतचे परिपत्रक संके तस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार बुद्धिस्ट संस्कृती व पर्यटनाचे भारत हे जागतिक केंद्र होण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करत आहे. त्यात बौद्ध संस्कृती संबंधित अभ्यासक्रम, पर्यटनासंबंधित अभ्यासक्रम आणि पाली भाषेचा प्रचार, प्रसार यांचा त्यात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन संबंधित अभ्यासक्रमांच्या माहितीचे संकलन करून सर्वसमावेशक ‘डेटाबेस’ तयार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात शिक्षण संस्थांद्वारे राबवले जाणारे अभ्यासक्रम, माजी विद्यार्थी, बुद्धिस्ट संस्कृती आणि पाली भाषा या विषयांतील संशोधक-तज्ज्ञ, संस्थांतर्फे  माहिती संकलित केली जाणार आहे. विद्यापीठांना त्यांचे अभ्यासक्रम आणि संबंधित माहिती पाठवण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

देशभरातील विविध विद्यापीठे, संस्थांद्वारे बुद्धिस्ट संस्कृती, पर्यटन संबंधित अभ्यासक्रम राबवले जातात. देशभरातील नामांकित संस्थांमध्ये १५० हून अधिक अभ्यासक्रम आहेत. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन अशा विविध स्तरांवरील अभ्यासक्रमांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसह परदेशातील विद्यार्थ्यांनाही एकाच ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होऊ शके ल. तसेच संस्थांनाही नवे अभ्यासक्रम सुरू करायचे असल्यास पुनरावृत्ती टाळता येईल.

– डॉ. श्रीकांत गणवीर, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ