शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एकात्मिक वाहतूक विकास आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि या आराखडय़ाची अंमलबजावणी करताना सर्व शासकीय यंत्रणांमध्ये तसेच खात्यांमध्ये समन्वय असणेही आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात असे काही होत नाही.

पीएमपीच्या प्रवाशांसाठी जलद सेवा उपलब्ध व्हावी आणि पीएमपीसाठी स्वतंत्र मार्ग असावा, या उद्देशाने सातारा रस्त्यावर सन २००६-०७ मध्ये बीआरटी मार्गाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील हा पहिला बीआरटी मार्ग होता. त्यामुळे एकूणच या प्रकल्पाबद्दल त्या वेळी शहरात मोठी चर्चा झाली होती. हा पहिलाच प्रकल्प असल्यामुळे त्याला त्या वेळी प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) असे म्हटले जात होते. हा मार्ग सुरू होताना आणि नंतरही तो सातत्याने टीकेचा विषय ठरला. त्यामुळे या प्रकल्पात सतत काही ना काही बदल करावे लागले. वेळोवेळी बीआरटीबाबत सूचना केल्या गेल्या. या बीआरटी मार्गावर सातत्याने विविध कामे केली जात असल्यामुळे आणि वेगवेगळे प्रयोग केले जात असल्यामुळे दहा-अकरा वर्षांनंतरही बीआरटीचा हा मार्ग प्रायोगिकच ठरला आहे.

सातारा रस्त्यावरील बीआरटी अद्यापही प्रायोगिकच असल्याचा हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला तो सध्या या मार्गावर जी विकासकामे सुरू आहेत, त्या कामांमुळे. तब्बल पंचाहत्तर कोटी रुपये खर्च करून महापालिका या बीआरटी मार्गावर विकासकामे करत आहे. स्वारगेटपासून बीआरटी मार्ग सुरू होतो आणि तो कात्रज स्थानकापर्यंत जातो. हे अंतर सव्वासहा किलोमीटर एवढे आहे. या अंतरात ही कामे केली जात आहेत. बीआरटी मार्ग तसेच दोन्ही कडेने सेवा रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक आणि अन्य वाहनांसाठी मार्गिका अशी या रस्त्याची रचना असेल. हे काम पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम प्रोजेक्ट अंतर्गत होत असून आयबीआय ही कंपनी हे काम करत आहे. या रस्त्यावरील पदपथ आणि सायकल ट्रॅकचीही पुनर्बाधणी या कामात होणार आहे.

महापालिकेकडून या मार्गावर जी पुनर्रचना केली जात आहे, ती देखील प्रायोगिकच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात मेट्रो मार्गिकेचे जे नियोजन करण्यात आले आहे, त्यातील एक मार्ग पिंपरी ते स्वारगेट असा आहे आणि या मेट्रो मार्गिकेचा कात्रजपर्यंत विस्तार करण्याची मागणी झाल्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक असलेली प्रक्रियाही लगेचच सुरू करण्यात आली. या प्रक्रियेला वेग आल्यामुळे बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेवर जे पंचाहत्तर कोटी रुपये खर्च केले जात आहेत, त्या कामाचे मेट्रो विस्तारीकरणानंतर काय होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वास्तविक संपूर्ण शहरातील वाहतुकीचे कसे नियोजन असेल याचा विचार करून त्याचा एकात्मिक वाहतूक आराखडा असणे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेने असे अनेक आराखडे तयार करून घेतले आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. वाहतुकीचा एकात्मिक विचार करून नियोजन केले गेले असते तर बीआरटी मार्गावर जो प्रश्न निर्माण झाला आहे तो झाला नसता. त्यामुळेच एकात्मिक वाहतुकीचा विचार महापालिका प्रशासनाला गांभीर्याने करावा लागणार आहे.

शहरात अनेक ठिकाणी उड्डाण पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या बरोबरच रस्त्यांचे रुंदीकरण व अन्यही कामे नियोजित आहेत. एकीकडे अशा कामांचे नियोजन केले जात असतानाच मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचीही मागणी विविध भागांमधून केली जात आहे. सिंहगड रस्त्यावर मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोलापूर रस्त्यावरील मेट्रोसाठीही प्रकल्प अहवाल तयार करून घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार करताना आणि नवे मेट्रो मार्ग सुरू करताना त्यात सध्याच्या उड्डाण पुलांचे तसेच अन्यही अडथळे येणार आहेत. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणात ही बाब दिसून येत आहे.

सातारा रस्त्यावरील मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण करण्यात उड्डाण पुलांचा अडथळा येत असल्याने त्याबाबत महामेट्रोला उपाययोजना करावी लागणार आहे. वाहतुकीचे विविध प्रकल्प राबवताना महापालिकेचे विविध विभाग, राज्य शासनाचे विविध विभाग तसेच महामेट्रो या सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय असणे किती आवश्यक आहे हेच वेळोवेळी दिसत आहे. असा समन्वय नसल्यामुळेच वारंवार पदपथ दुरुस्त केले जातात. असा समन्वय नसल्यामुळे आधी रस्त्याचे डांबरीकरण होते आणि नंतर तोच रस्ता खोदून अन्य कामे केली जातात. मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवताना तर असा समन्वय असण्याची अधिकच गैरज निर्माण झाली आहे. मुळात वाहतूक सुधारणेसाठी वाहतुकीच्या सर्व पर्यायांचा अंतर्भाव असलेला एकात्मिक वाहतूक विकास आराखडा तयार करून त्यानुसारच कामे होणे अपेक्षित असताना असा आराखडा अमलात आणण्याऐवजी प्रत्येक विभाग आपापल्या वेळापत्रकानुसार कामे करत आहे आणि त्यामुळेच समन्वयाचा अभावही सातत्याने समोर येत आहे.

समन्वयाच्या या अभावामुळेच सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग दहा वर्षांनंतरही प्रायोगिक तत्त्वावरच सुरू आहे. या एकाच मार्गावर वाहतूक सुधारणेचे किती प्रयोग केले जाणार आहेत, ते तूर्त प्रशासनालाही माहिती नाही.