राज्यातल्या सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावू असा दबाव टाकला जातो आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते भाजपा आणि सेनेत जात आहेत. आमच्या पक्षातल्या भाकड गायीच सत्ताधारी पक्षात जात आहेत, त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  तसंच शिवसेना आणि भाजपाचे दोन आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक राजकीय घडामोडींवर भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील सध्याची पक्षाची परिस्थिती लक्षात घेता. आम्ही पुन्हा नव्या चेहर्‍यांना संधी देऊ आणि नव्याने उभारी घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर भाजप आणि सेनेची लाट पाहून आमच्याकडील तिकडे जात आहे. भविष्यात लाट कमी झाल्यावर आमच्याकडे निश्चित संख्या वाढेल असेही त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आगामी काळात देशभरात अनेक राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्याच काळात महाराष्ट्रामध्ये देखील निवडणूक होते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले वातावरण आहे. त्यामुळे आमची सत्ता राज्यात येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदी रूपाली चाकणकर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष असताना. पुण्यातील महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेश अध्यक्षपदी आज पुण्यात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, प्रवक्तया विद्या चव्हाण या देखील उपस्थित होत्या.