18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

१७ तासांनी जेजुरीच्या ‘मर्दानी’ दसऱ्याची सांगता

जेजुरी परिसरात भंडाऱ्याची मुक्त उधळण

जेजुरी | Updated: October 1, 2017 8:16 PM

जेजुरी गडावरील मर्दानी दसऱ्याची सांगता १७ तासांनी

मध्यरात्रीचे चांदणे, हवेतला गारवा, ‘सदानंदाचा येळकोट’ चा गजर, आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा आणि दरीत घुमणारा फटाक्यांचा आवाज या सगळ्या वातावरणात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची सांगता झाली. कडेपठार येथील रमणा या ठिकाणी भाविकांच्या भक्तीप्रेमाला उधाण आले होते. खंडोबाच्या पारंपरिक भेटीचा सोहळा सगळ्यांनीच अनुभवला. हजारो भाविकांची या सोहळ्याला हजेरी होती. रमणा भागात कडेपठार येथील पालखी आणि खंडोबा गडाची पालखी यांची भेट रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. जेजुरीचा हा मर्दानी दसरा १७ तास सुरु होता.

शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला खंडोबा गडावर पेशवे इनामदार यांनी सूचना देताच मानकऱ्यांनी पालखी खांद्यावर उचलून धरली. भंडारघरातून सातभाई आणि बारभाई पुजाऱ्यांनी खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्ती आणून पालखीत ठेवल्या. यावेळी भंडारा आणि आपट्याच्या पानांची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ याचा अनुभव भाविकांनी घेतला. ही पालखी रमणा या ठिकाणी नेण्यात आली.

कडेपठार येथील देवाच्या मूळ स्थानापासून तेथील मूळ पालखी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काढण्यात आली. सनई, ढोल, कर्णा शंख डमरू, संबळ, अशी पारंपारिक वाद्ये वाजवित फटाक्याची आतषबाजी करीत पालखी पुढे सरकत होती.कठीण उंचवटे, वळणे, चढ-उतार पार करुनही खांदेकर्‍याचा उत्साह कायम होता.

मानकरी राऊत कुटुंबीयांनी शोभेचे दारूकाम केले.नंतर पालखी डोंगरामधील भेटाभेटीच्या जागेवर आणून ठेवल्यावर दोन्ही पालख्यांसमोर हवाई नळे, भुईनळे मोठ्या प्रमाणामध्ये उडविण्यात आले.दोन पालख्यातील अंतर चारशे मीटर आहे.नाभिक समाजातील मानकरी राऊत परिवारांतर्फे आरसा दाखविला गेला,भेटाभेट होताच पालखी ऐतिहासिक पेशवे तलावामार्गे जेजुरीत आणण्यात आली.वाटेत डिखळे-भालेराव यांनी लावलेल्या आपट्याच्या झाडाचे पूजन झाल्यावर मानकरी झगडे परिवाराने सोने वाटले.रविवारी पहाटे नगरपालिकेसमोर उभ्या केलेल्या रावणाचे दहन करण्यात आल्यावर पालखीसमोर प्रचंड फटाके उडविण्यात आले.

जामा मशिदीजवळ मुस्लिम बांधवांनी पालखीचे स्वागत केले.पहाटे धनगर बांधवांनी खंडोबा गडाच्या पायथ्याशी सुंबरान मांडले.जुन्या धनगरी ओव्या व गाणी म्हणण्यात आली.त्यांनी पालखीतील देवाच्या मुर्तींवर मेंढ्याची लोकर उधळली.सकाळी सात वाजता पालखीने गडामध्ये प्रवेश केला.यावेळी स्थानिक कोल्हाटी,घडशी समाजातील कलावंतांनी देवा पुढे गाणी, लावण्या, सोले म्हणून देवाचे मनोरंजन केले.पालखी नाचवत-खेळवत भंडारघरात नेण्यात आली तेथे रोजमोरा (ज्वारी) वाटप झाले.खंडोबाचा प्राचिन खंडा (तलवार) उचलणे स्पर्धा अकरा वाजता संपल्यावर दसरा सोहळ्याची सांगता झाली.

 

First Published on October 1, 2017 8:16 pm

Web Title: jejuris dasara palakhi ceremony ended after 17 hours