अगदी तीनच दिवसांपूर्वी रात्री चांगलीच थंडी जाणवत असताना पुणे शहर आणि परिसरातील तापमानात एकदमच वाढ झाली असून, शहरातील वातावरण थंडीकडून लगेचच हलक्या उकाडय़ाकडे गेले आहे. ७ डिसेंबरला सरासरीखाली असलेले रात्रीचे किमान तापमान आता सरासरीपेक्षा तब्बल ७.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. परिणामी थंडी पूर्णत: गायब झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा परिणाम जाणवत असून, शहरात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यताही पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

समुद्रांमधील चक्रीवादळांचा परिणाम म्हणून काही दिवस वगळता नोव्हेंबर महिना कडाक्याच्या थंडीविनाच गेला. केवळ १२ नोव्हेंबरला शहरात राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानाचा पारा इतक्या खाली जाऊ शकला नाही. डिसेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात काही प्रमाणात घट होऊ लागली होती. दुसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून तापमानाचा पारा सरासरीखाली जाऊन काही प्रमाणात थंडी अवतरली होती. रात्री उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे कठीण झाले होते. या काळातही शहरात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मात्र, एक-दोन दिवसांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली.

अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. या भागातून बाष्पाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. ६ डिसेंबरला १०.४ अंश सेल्सिअसवर असलेले रात्रीचे किमान तापमान १० डिसेंबरला थेट १८.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी असलेले तापमान आता सरासरीपेक्षा ७.२ अंश सेल्सिअसने वाढल्याने संध्याकाळी थंडीऐवजी हलका उकाडा जाणवतो आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. ६ डिसेंबरला हे तापमान २९.७ अंश होते. ते १० डिसेंबरला ३१.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले.

दरम्यान, पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, ११ डिसेंबरला शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. १२ डिसेंबरलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. १३ डिसेंबरलाही शहरात आकाळ अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

तापमानातील वाढ

दिनांक  कमाल  किमान

६ डिसेंबर   २९.७   १०.४

७ डिसेंबर   ३०.१   १०.७

८ डिसेंबर   ३०.१   ११.८

९ डिसेंबर   ३०.२   १४.५

१० डिसेंबर  ३१.६   १८.६

(अंश सेल्सिअसमध्ये)