महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याच्या विरोधात थेट सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांना सोमवारी रात्री ई मेल करून तक्रार केल्यानंतर तेवढय़ावरच न थांबता, मंगळवारी रात्री पुन्हा तसाच प्रकार डॉ. परदेशी यांनी केला. या प्रकाराबाबत वेलणकर यांनी तीव्र हरकत घेतली असून अधिकाऱ्यांचा प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचाच हा पुरावा आहे, असे वेलणकर यांनी आयुक्तांना कळवले. त्यानंतर डॉ. परदेशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्या विरुद्ध त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याची, तसेच त्यांनी मिळवलेली बढतीही बेकायदेशीर असल्याची तक्रार करणारा एक अर्ज दाखल झाला आहे. या गंभीर विषयात आपण लक्ष घालावे, अशी विनंती करणारा ई मेल डॉ. परदेशी यांनी वेलणकर यांना सोमवारी रात्री पाठवला होता. या प्रकाराबाबतची तक्रार वेलणकर यांनी लगेचच आयुक्तांकडे केली. डॉ. परदेशी यांनी अशाप्रकारे स्वत:च्याच विभागातील एका महिला अधिकाऱ्याविरुद्ध झालेल्या तक्रारीची कागदपत्र बाहेर पाठवण्याचा प्रकार गंभीर आहे. माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न परदेशी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी मंगळवारी आयुक्तांकडे केली.
माहिती अधिकार कायद्यातील कार्यकर्त्यांना कागदपत्र पाठवण्याचा प्रकार सोमवारी रात्री केल्यानंतर परदेशी यांनी पुन्हा डॉ. जाधव यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारीची आणखी काही कागदपत्र मंगळवारी रात्री वेलणकर यांना ई मेलद्वारे पाठवली. या प्रकाराबाबत काही भाष्य करण्याची गरज नाही. महापालिका अधिकाऱ्यांचाच प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाल्याचा हा पुरावा आहे. निदान आता तरी या प्रकाराची गंभीर दखल आपण घ्यावी, अशी मागणी वेलणकर यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. आयुक्तांकडे करण्यात आलेल्या या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी डॉ. परदेशी यांना या प्रकाराबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली.