वाढदिवसाच्या दिवशी घरात कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अद्विका धरतेज गाथाडे (वय १) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. गाथाडे कुटुंबातील लाडक्या कन्येच्या पहिल्याच वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्विका गॅलरीमध्ये खेळत असताना ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, नरे येथील राजवीर हाईट्स या सोसायटीमध्ये धरतेज गाथाडे हे राहतात. त्यांच्या मुलीचा अद्विका हीचा बुधवारी पहिलाच वाढदिवस होता. यावेळी घरामध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास वाढदिवसाची तयारी सुरू होती. यावेळी अद्विका गॅलरीमध्ये खेळत होती. तर तिचे बाबा बाथरूमला गेले होते आणि आई सोसायटीतील लोकांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेली होती. याचवेळी अद्विका गॅलरीमधून खाली पडली. ही घटना शेजारी राहणार्या मंडळीनी पाहताच अद्विकाच्या कुटुंबियांना सांगितले. यानंतर तिला तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेचा तपास सिंहगड पोलीस करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2020 2:08 pm