मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

जुलै संपत आला, तरी पुण्यात पाऊस पडलेला नाही. गेली अनेक दशके शाळा सुरू होताना सोबतीला असलेला पाऊस, यंदा शाळाच नसल्याने कुठे दडी मारून बसला आहे, ते कळत नाही. हवामान खात्याने पुण्याच्या पावसाबद्दल आजवर केलेले अंदाज चुकीचे ठरले आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीच्या क्षेत्रातही पाऊस पडलेला नसल्याने येत्या काही काळात पुण्याचे पाणी संकट अधिक गंभीर होईल, यात शंका नाही. घरी-दारी नळ सोडताना हे किती जण लक्षात घेत असतील कोण जाणे.. परंतु पावसाने दगाबाजी केलीच तर पुणे हे दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन या शहरासारखे उजाड होईल, अशी भीतीही कोणाला वाटत नाही. सगळे सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक पाण्याच्या बाबतीत कधीच गंभीर राहिलेले नाहीत, म्हणून ही वेळ या देशातील एका अत्यंत महत्त्वाच्या शहरावर येत आहे.

सर्वाधिक पाणी पिणारे शहर म्हणून पुण्याने मिळवलेला लौकिक दूर करण्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते गेल्या अनेक दशकांत कुणीही केले नाही. पुणे शहराला खडकवासला धरणातून जे पाणी मिळते, त्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करून त्याचे समान वाटप करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ज्या ज्या योजना आखल्या, त्या कधीही अस्तित्वात येऊ शकल्या नाहीत. स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिका यांच्यात विस्तवही जात नसल्याने या दोन्ही संस्था एकमेकांवर फक्त कुरघोडी करण्याचे राजकारण करत बसतात. सामान्यांना मात्र त्याचा विनाकारण त्रास होतो. समान पाणीवाटप योजनेचे जे झाले, तेच पाण्याच्या गळतीबाबतही. मिळणारे पाणी आणि प्रत्यक्ष पोहोचणारे पाणी यामध्ये असलेली प्रचंड तफावत पाहिली, तर पाण्याची गळती थांबवणे हे पालिकेचे प्रथम क्रमांकाचे काम असायला हवे. पण एकाही पक्षाच्या नेत्याला हे काम महत्त्वाचे वाटत नाही.

आत्ता धरण साखळीत असलेले पाणी आणखी काही महिने पुरेल, असे पालिकेकडून सांगितले जाते. पाऊस पडत नाही, हे लक्षात आल्यावर आहे तो पाणीसाठा अधिक काळासाठी कसा पुरेल, याचा विचार करायचा, तर पाणीवाटपात कपात करायला हवी. ही कपात करणे म्हणजे नागरिकांचा रोष ओढवण्यासारखे आहे, असे समजण्याचा मूर्ख प्रघात राजकीय वर्तुळात अनेक वर्ष आहे. पाऊस पडणे ही निसर्गाची प्रक्रिया असते. तो पाऊस राजकारणी पाडत नसतात. मग तो कमी पडला, तर कमी पाणी देण्याने रोष कसा ओढवतो, हे समजण्यापलीकडचे आहे. पण कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरीही विचार करण्याच्या या पद्धतीत कधीच बदल होत नाही. लातूरसारखे पुण्याला रेल्वेने पाणीपुरवणे कधीही शक्य नाही, हेही न समजणारे राजकारणी आपल्या या शहराचे नेतृत्व करतात, याबद्दल समस्त पुणेकरांनी डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

पावसाने ओढ दिली आहे, तर लगेचच पाणीकपात करणे हे अल्पकालीन धोरण झाले. मुळातच पाण्याचे नियोजन बारा ते पंधरा महिन्यांसाठी करायचे असते, याची कल्पनाही नसणाऱ्या कारभाऱ्यांना केवळ पावसाळा संपल्यानंतर पुढील पावसाळा येईपर्यंतच्या काळासाठीच हे नियोजन करायचे असते, असे वाटत असेल, तर काय करणार? गेल्या वर्षी पाऊस उशिरा आला. आला तो गरजेपेक्षा अधिक आला. यंदाही असेच होईल, असे समजणे म्हणजे सारा कारभार रामभरोसे असल्यासारखे आहे. करोनाच्या संकटाएवढेच खरेतर अधिक गंभीर संकट पाण्याचे आहे, हे कोणीही लक्षात घेत नाही. या सगळ्यांना पाऊस नक्की येणार, असा भरवसा कशामुळे वाटतो? असा बावळट प्रश्न विचारून कारभाऱ्यांच्या भक्तिभावाला टाचणी लावण्याचे कारण नाही. ज्यांना शहराचा एकही प्रश्न सोडवता आला नाही, अशांकडून बारा महिने पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे, एवढे पुणेकरांनी पक्के लक्षात ठेवावे.