‘मोक्का’ लावलेल्या महिलेचे अमली पदार्थ विक्रीचे जाळे

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेती महिला आरती मिसाळ  हिने अमली पदार्थ विक्री व्यवसायातून मोठय़ा प्रमाणावर संपत्ती क मवाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मिसाळ आणि तिच्या साथीदारांना अमली पदार्थ विक्रीचे जाळे उभे केले. महाविद्यालयीन तरुण, झोपडपट्टीतील मुले तसेच पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना तिने अमली पदार्थाची विक्री केली. या बेकायदा व्यवसायातून तिने तीन सदनिका, दोन मोटारी खरेदी केल्याचे तसेच बेकायदा सावकारी करून बक्कळ पैसा कमाविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख आरती महादेव मिसाळ (वय २७, रा. इनामके मळा, लोहियानगर), पूजा महादेव मिसाळ (वय ३२, रा. इनामके मळा, लोहियानगर), निलोफर हयात शेख (वय २७), अजहर हयात शेख (वय २४, दोघे रा. हरकानगर, भवानी पेठ), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय २३, रा. रामटेकडी, हडपसर), आशाबी पापा शेख, जुलैखाबी पापा शेख (दोघी रा. मुंबई) यांच्यासह नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरती मिसाळ हिने संघटित रीत्या अमली पदार्थ विक्री सुरू केली होती. तिने अनेक तरुणांना अमली पदार्थाची विक्री करून व्यसनाधीन बनवले होते. मिसाळ, शेख, क ल्याणी यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर यांनी या प्रकरणाचा  तपास केला होता. मिसाळने साथीदारांना हाताशी धरून अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय वाढवून मोठय़ा प्रमाणावर संपत्ती कमाविल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी मिसाळ आणि तिच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थाची विक्री

आरती मिसाळ आणि तिच्या साथीदारांनी अमली पदार्थाची विक्री अनेक तरुण मुलांना केली. त्यांना व्यसनाधीन बनवले. मुंबईतील सांताक्रुझ भागातून तिला अमली पदार्थाचा पुरवठा व्हायचा. महाविद्यालय तरुण आणि परदेशी विद्यार्थ्यांना ब्राऊन शुगर आणि चरसची विक्री मिसाळ आणि तिचे साथीदार करायचे. एक मिलीग्रॅम पेक्षा  कमी वजन असलेल्या अमली पदार्थाची पुडीची विक्री १२० ते १५० रुपयांना केली जायची. मिसाळने अमली पदार्थ विक्रीतून रामटेकडी भागात घर घेतले तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, वाघोली भागातील उच्चभ्रू सोसायटीत तिने सदनिका विकत घेतल्या. बेकायदा सावकारी करून बक्कळ पैसा कमाविला. दोन मोटारी घेतल्या. मिसाळने दुसऱ्याच्या नावावर सदनिका खरेदी केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. तिच्या व्यवहारांची पाळेमुळे पोलिसांकडून खणून काढण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी वेश्याव्यवसाय दलाल कल्याणी देशपांडे हिच्यावर पोलिसांनी ‘मोक्कां’तर्गत कारवाई केली होती. त्यानंतर आरती मिसाळवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दोन महिलांवर पोलिसांकडून  मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे.