राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेची अद्याप प्रक्रिया सुरु असतानाच या आघाडीला पुण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीपासून सुरुवात झाली आहे. कारण, या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्र्वादी काँग्रेसने एकत्रितपणे महापौरपदासाठी आपला उमेदवार दिला आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. यांची महाविकास आघाडी झाली असून हीच आघाडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पाहण्यास मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण गटासाठी सोडत निघाली. त्यानुसार महापौरपदासाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला होता. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला होता.

त्यानुसार आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहात झालेल्या निवडणुकीत महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका चांदबी नदाफ या दोघांच्या बाजूने शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले. यामुळे पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतूनच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीला सुरुवात झाली आहे.