News Flash

पाठिंबा दिला तरी राष्ट्रवादी शत्रू क्रमांक एकच – जानकर

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वत:हून पाठिंबा दिला असेल, तर तो घेण्यास हरकत नाही. पण, आमच्यासाठी तेच शत्रू क्रमांक एक राहणार आहेत.

| November 15, 2014 03:27 am

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वत:हून पाठिंबा दिला असेल, तर तो घेण्यास हरकत नाही. पण, आमच्यासाठी तेच शत्रू क्रमांक एक राहणार आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले.
राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी झाला. त्या वेळी जानकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत हरकत नाही, कारण शेवटी सत्ता आमचीच राहणार आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. धनगर समाजाबरोबरच मराठा आरक्षणासाठीही आम्ही प्रयत्न करू. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आम्हाला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. कॅबिटेन मंत्रिपदाबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सिंचन घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहोत, असेही ते म्हणाले.
मेळाव्यात बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम जाहीर केला. एक रुपयामध्ये पक्षाचे सदस्यत्व, प्रत्येक जिल्ह्य़ात एक लाख सदस्य करण्याचे लक्ष्य, पुण्यात प्रदेश कार्यालय व ३० जानेवारीला बारामतीमध्ये मेळावा, अशी मोहीमही त्यांनी जाहीर केली.
मेळाव्याला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार राहुल कुल यांच्यासह पराभूत झालेले उमेदवार रत्नाकर गुट्टे (गंगाखेड), माधवराव नाईक (कळमनुरी), शेखर गोरे (माण), बाळासाहेब पाटील (भूम) यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर, पश्चिम महाराष्ट्र महिलाध्यक्ष डॉ. उज्ज्वला हाके, संघटक दादासाहेब केसकर, पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे आदी या वेळी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन राधाकृष्ण बाजकर यांनी केले.
‘भाजप आम्हाला विसरणार नाही’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले गृहस्थ असून, ते आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला विसरणार नाहीत, असा विश्वास महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. मात्र, माझा पक्ष कोणावरही अवलंबून न राहता पक्ष वाढीचा कार्यक्रम अमलात आणणार आहे. जे मिळवू ते सन्मानाने मिळवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वतीने दिल्ली व झारखंड विधानसभा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 3:27 am

Web Title: mahadev jankar ncp bjp meeting
Next Stories
1 मोटारीवरील दिव्याची ‘प्रतिष्ठा’!
2 आठवडय़ातून एकदा ‘नो व्हेइकल झोन’चा प्रस्ताव
3 आरोग्यावरील नवीन पुस्तकांनी गाठली ‘शंभरी’!
Just Now!
X