आपण अनेकदा ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री करतो. परंतु त्यात समोरची व्यक्ती कोण आहे याची अनेकदा आपण पडताळणी करत नाही किंवा समोरच्यावर सहज विश्वास ठेवून व्यवहार करतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. ओएलएक्सवर दुचाकी गाडीची जाहिरात करून आणि विक्री करून तिच चोरणाऱ्याला गजाआड करण्यात आले आहे. दर्शन जयकुमार अग्रवाल (वय ३४) असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन कुमार अग्रवाल हा आरोपी मूळचा नाशिकचा आहे. आरोपीने आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रं चोरून डाऊनपेमेंटवर अनेक गाड्यांची खरेदी खरेदी केली होती. या गाड्यांची विक्री करण्यासाठी तो ओएलक्सवर जाहिरात द्यायचा. त्यानंतर, ज्या व्यक्तीला गाडी विकली, त्या व्यक्तीचा पाठलाग करून, घराचा पत्ता मिळवायचा आणि पुन्हा ती गाडी चोरून आणायचा. पुन्हा त्या गाडीची जाहिरात ओएलक्सवर द्यायचा, असे प्रकार तो सतत करत होता.

राहुल कुमेरिया या तरुणाला दर्शननं ५८ हजार रुपयांत व्हेस्पा गाडी विकली होती. त्यानंतर आरोपी दर्शन यानं राहुलचा पाठलाग करत त्याच्या ऑफीसचा पत्ता मिळवला आणि बनावट चावीनं गाडी चोरून नेली. राहुल सायंकाळच्या सुमारास घरी जाण्यास निघाला, तेव्हा गाडी चोरीला गेल्याचं समजलं. त्यानंतर पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, ज्या व्यक्तीकडून गाडी घेतली होती त्या व्यक्तीनं गाडी चोरल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यानं याविरोधात पोलीस स्थानकात तक्रारदेखील दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गाडी चोरणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला होता. त्याच दरम्यान, ओएलक्सवर व्हेस्पा पुन्हा एकदा विक्रीसाठी असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दरम्यान, अटक केल्यानंतर आरोपीनं अशा प्रकारे तीन जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.