पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सत्तर पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्या करण्याचे आदेश दिल्यानंतर असंतोष निर्माण झाला होता.
या पाश्र्वभूमीवर पुणे शहरातील आठ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मुंबईतील मॅट न्यायालयात धाव घेऊन मुदतपूर्व बदल्यांना स्थगिती देण्याची विनंती केली होती. मॅट न्यायालयाने मंगळवारी पुण्यातील त्या नऊ पोलीस निरीक्षकासह एका सहायक पोलीस निरीक्षकाच्या मुदतपूर्व बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांना मूळ पदावर ठेवण्याचे आदेशही मॅट न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ३६८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गेल्या मंगळवारी ( २४ मे) दिले होते. यामध्ये जवळपास सत्तर पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस दलात असंतोषाचे वातावरण होते. पुण्यातील नऊ पोलीस निरीक्षकांसह एका सहायक पोलीस निरीक्षकांने या बदल्यांना स्थगिती देण्याचे मागणी केली होती. मुंबईतील प्रशासकीय न्यायाधिकरणात ( मॅट) अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी या अर्जावर मॅट न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर पुण्यातील नऊ पोलीस निरीक्षकासह एका सहायक निरीक्षकाच्या बदलीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले. मॅट न्यायालयाकडून स्थगिती मिळविलेल्या पुण्यातील पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे- सीताराम मोरे, सुनील पवार, मिलिंद गायकवाड, स्मिता जाधव, मसाजी काळे, रघुनाथ फुगे, मसाजी काळे, संदीपान सावंत, ब्रह्मानंद नायकवाडी, अजय वाघमारे.

आयुक्तालयात अंतर्गत बदल्या
पोलीस महासंचालक कार्यालयातून बदलीचे आदेश पुण्यात रुजू झालेल्या सोळा आणि आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ३४ अशा पन्नास पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले. दरम्यान, पुणे पोलीस दलातील सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे- सुरेश भोसले ( विशेष शाखा ते गुन्हे शाखा), राम मांडूरके (प्रशासन ते पिंपरी विभाग), महेंद्र रोकडे (वाहतूक ते विशेष शाखा), सतीश पाटील ( गुन्हे शाखा ते विशेष शाखा), राजेंद्र जोशी (गुन्हे शाखा ते महापालिका अतिक्रमण विभाग), कविता नेरकर ( वाहतूक ते प्रशासन विभाग), सतीश पाटील (गुन्हे शाखा ते विशेष शाखा)