बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाअंतर्गत महापालिकेकडून तीन टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर कामे सुरू झाली आहेत. नदीकाठ लगतच्या शासकीय आणि खासगी  जागा मालकांना जागा ताब्यात देण्यासंदर्भातील नोटिसा महापालिकेकडून पाठविल्या असून नदीकाठ विकसन प्रकल्पाचे प्रारूप अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत प्रारूप जाहीर करण्यात येणार असून तीन टप्प्यातील कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, नदीकाठ संवर्धनासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास राज्य शासनानेही मान्यता दिली असून अंदाजपत्रकातही या प्रकल्पासाठी १५० कोटींची तरतूद असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.

गुजरात मधील साबरमती नदीच्या धर्तीवर महापालिकेचा हा प्रकल्प असून या प्रकल्पाला सन २०१५ मध्ये मान्यता देण्यात आली. गेल्या आठवड्यात प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वीच महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाअंतर्गत कामे सुरू केली आहेत. एकूण सहा टप्प्यात प्रकल्पाची विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या तीन टप्प्यातील कामांना सध्या प्राधान्य देण्यात आले आहे. मुंढवा पूल ते मुंढवा जॅकवेल (खराडी), बंडगार्डन पूल ते संगमवाडी पूल, औंध-बाणेर-बालेवाडी भागात प्रकल्पाची कामे करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

खराडी, औंध, बंडगार्डन या तीन टप्प्यातील कामांचा प्रारूप आराखडा आणि संकल्पचित्र करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंडगार्डन ते संगमवाडी या टप्प्यात महापालिकेला अल्प भूसंपादन करावे लागणार आहे. दरम्यान, महापालिकेने नदीकाठचे सर्वेक्षण केले असून जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनासही महापालिकेने पत्रव्यवहार केला असून खासगी जागा मालकांबरोबरच शासकीय यंत्रणांनाही महापालिकेने जागा ताब्यात देण्यासंदर्भात नोटिसा बजाविल्या आहेत.

विविध उद्देश

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे नदीची पूरवहन क्षमता वाढणार असून नदीलगतचा भाग सुरक्षित करणे, नदी किनारी हरितपट्टा विकसित करणे, मोकळ्या जागेअंतर्गत नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, बाक, उद्यान अशा सुविधा, नदीलगतच्या वारसा स्थळांचे जतन, किनाऱ्या लगतची अतिक्रमणे रोखणे असे विविध उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहेत. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

तीन संस्थांची स्वतंत्र कंपनी

मुळा, मुठा नद्या या पिंपरी-चिंचवड, खडकी कॅ न्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिका हद्दीतून वाहात असल्यामुळे आणि नदीच्या जागेबाबत महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभाग यांचा संबंध येत असल्यामुळे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी या तिन्ही संस्थांची मिळून स्वतंत्र कं पनी स्थापन करण्यात आली आहे.

तीन टप्प्यांत प्रकल्प

प्रकल्प राबविताना तीन टप्प्यांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. संगमपूल ते बंडगार्डन (दोन्ही काठ मिळून ९.२ किलोमीटरचे अंतर), मुंढवा ते खराडी (दोन्ही काठ मिळून ७.१ किलोमीटरचे अंतर) आणि औंध ते बाणेर (दोन्ही काठ मिळून ८.५ किलोमीटरचे अंतर) या तीन टप्प्यांचा यामध्ये समावेश आहे.