देशात यंदा, सलग दुसऱ्या वर्षी नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी (९३ टक्के) पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. पावसावर विपरित परिणाम करणारा ‘एल-निनो’ हा घटक सध्या फारसा सक्रिय नसला तरी प्रत्यक्ष पावसाळ्यात त्याचा प्रभाव पडणार असल्याने पावसाचे प्रमाण कमी dv07असेल, असे जाहीर करण्यात आले. २०१४ सालच्या पावसाळ्यात सरासरीच्या ८८ टक्के इतका पाऊस झाला होता. हा पहिल्या टप्प्यातील अंदाज असून, सुधारित अंदाज जून महिन्यात जाहीर होईल.
हवामान विभागानुसार ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडल्यास तो सरासरीइतका मानला जातो. ९० ते ९६ टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी, तर ९० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस पडला तर दुष्काळी स्थिती समजली जाते. भारतात पावसाळ्यात सरासरी ८९० मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षीच्या सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यात ५ टक्क्य़ांची तफावत असू शकते, असे केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी सांगितले. वायव्य व मध्य भारतात (महाराष्ट्रासह) कमी पावसाचा फटका बसू शकेल, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव शैलेश नायक यांनी सांगितले. अर्थ सिस्टिम सायन्स ऑर्गनायझेशन (आएसएसओ) आणि पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) यांच्या वतीने ‘कपल्ड मॉडेल’द्वारे प्रायोगिक पातळीवर पावसाचा अंदाज दिला जातो. त्यानुसार तर देशात ९१ टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने मोसमी पाऊस सुरळीत असेल असे नुकतेच म्हटले होते. त्याच्या विपरित अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.

‘एल निनो’ म्हणजे काय?
पूर्व-मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागर व दक्षिण अमेरिकेतील प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले की त्याचा विपरित परिणाम भारतातील मोसमी पावसावर होतो. ही स्थिती उद्भवली की एल-निनो सक्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे भारतात मोसमी पाऊस कमी पडण्याची दाट शक्यता असते.

अपुऱ्या पावसाचीच सर्वाधिक शक्यता :देशात या वर्षी कोणती स्थिती उद्भवण्याची किती टक्के शक्यता आहे, हेही या अंदाजात देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे:
*दुष्काळी स्थिती (सरासरीच्या ९० टक्क्य़ांपेक्षा कमी)            ३३ टक्के
*अपुरा पाऊस (सरासरीच्या ९० ते ९६ टक्के)                          ३५ टक्के
*सरासरीइतका (९६ ते १०४ टक्के)                                         २८ टक्के
*सरासरीपेक्षा जास्त (१०४ ते ११० टक्के)                                 ३ टक्के
*अतिवृष्टी (सरासरीच्या ११० टक्क्य़ांपेक्षा जास्त)                  १ टक्के