शिवसेनेचे मावळचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा पक्षवर्तुळात असतानाच कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा न सोडण्याच्या मनस्थितीत असलेल्या बाबरांनी रविवारी वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे.
आकुर्डीतील उर्दू शाळेच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी बाबर समर्थकांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांना येण्याचे आवाहन दूरध्वनी, व्हॉट्स अप, फेसबुक आदींच्या माध्यमातून दिले जात आहे. या ठिकाणी ‘गोड-तिखट’ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात बाबरांनी वाढदिवस केल्याचे उदाहरण नाही. मात्र, उमेदवारी धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने त्यांनी कधी नव्हे ते स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. तीन वेळा नगरसेवक, दोनदा आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि मावळचे पहिले खासदार या क्रमाने राजकीय प्रवास करणाऱ्या बाबरांना आगामी निवडणुकीत पक्षाची उमेदवारी नाकारण्याचे संकेत आहेत. त्यासाठी बाबर यांचे वाढते वय हे कारण पुढे करण्यात येत आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहसंपर्कप्रमुख व िपपरी पालिकेतील गटनेते श्रीरंग बारणे यांना मावळसाठी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जाते. या चर्चेने बाबर समर्थक अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा सोडण्याच्या मनस्थितीत बाबर नाहीत. त्यामुळेच त्यांनी आपले समर्थक व हितचिंतकांना एकत्र करून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची व्यूहरचना केली आहे.