तीव्र उतार व वळणाची ठिकाणे मृत्यूचा सापळा; वेग नियंत्रणासाठीही कठोर उपाययोजना हवी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असताना त्यांना रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत शासनाकडून घातकी कासवगतीची भूमिका घेण्यात येत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीला झालेल्या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. तीव्र उतार व वळणांची ठिकाणे मृत्यूचा सापळा झाली असून, या ठिकाणी उंच व मजबूत रस्ते दुभाजक त्याचप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असली, तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

द्रुतगती मार्गावर ठराविक ठिकाणीच सातत्याने अपघात होत असतात. त्यात खंडाळा एक्झीट व अमृतांजन पूल हा टप्पा अत्यंत धोकादायक आहे. या टप्प्यामध्ये किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे अपघात एक-दोन दिवसांनी होतच असतात. या भागात अपघात होण्याची कारणे शोधण्यासाठी आता कुणा तज्ज्ञाचीही गरज नाही. प्रत्येक अपघातावेळी ती कारणे स्पष्टपणे समोर येतात. अपघात होत असलेल्या भागांमध्ये तीव्र उतार व वळणाचा रस्ता आहे. वळवण गावापासून खालापूपर्यंत उतार व वळण आहे. या टप्प्यामध्ये अवजड वाहनांचे चालक वाहन न्यूट्रल करून चालवितात. परिणामी वाहनाचा वेग वाढतो व अचानक ब्रेक दाबण्याचा प्रसंग आल्यास ब्रेक लागत नाही. त्यामुळे अवजड वाहनावरील ताबा सुटतो. हे वाहन त्याच्या मार्गीकेवरील वाहनांना धडकण्याबरोबरच छोटा दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गीकेवर येते व तेथील वाहनांना धडकते.

अवजड वाहनांच्या बाबतीत हे प्रकार सातत्याने होत आहेत. डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीलाही अशाच प्रकारे दुसऱ्या मार्गीकेवरून आलेल्या ट्रेलरने धडक दिली. अगदी आजच नव्हे, तर द्रुतगती मार्ग सुरू झाल्यापासून अशा स्वरूपाचे अपघात होत आहेत. तेव्हापासूनच या भागामध्ये मजबूत रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांनीही तीन वर्षांपूर्वी दुभाजकांबाबत मागणी केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. काँग्रेस-राष्ट्रवाजी काँग्रेसच्या काळातही मंत्र्यांनी केवळ आश्वासनेच दिली. आता शासन बदलले तरी परिस्थिती बदलली नसल्याचे चित्र दिसून येते.

उर्से टोल नाका येथे तीन वर्षांपूर्वी मोटारीला अपघात होऊन प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी द्रुतगती मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला होता. रस्त्याच्या ९४ किलोमीटरच्या भागामध्ये दोन्ही बाजूला सेफ्टी रोप लावण्याचे आश्वासन शासनाने त्या वेळी दिले होते. मात्र, या कामातही दिरंगाई करण्यात येत आहे. द्रुतगतीवरील सुरक्षिततेबाबतच्या याच कासवगतीमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावे लागत आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने या प्रश्नात लक्ष घालून अपघात रोखण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

वाहनांच्या अतीवेगाबाबत कठोर कारवाई आवश्यक

द्रुतगती मार्गावरील बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मार्गावरील वाहनांची गती प्रतितास जास्तीत जास्त ऐंशी किलोमीटर ठेवण्याच्या सूचना आहेत. अनेकदा ही सूचना पाळली जात नाही. शंभरहून अधिक वेगाने वाहने चालविली जातात. परिणामी वाहनावरील ताबा सुटणे किंवा टायर फुटून अपघात होतात. पोलिसांच्या वतीने अनेकदा स्पीड गनच्या माध्यमातून अतीवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, त्यातील दंडाची रक्कम शंभर ते दोनशे रुपये असल्याने या कारवाईचा वचक बसत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ही कारवाई आणखी कठोर करण्याची मागणी करण्यात येत आहे.