15 November 2019

News Flash

नाटक बिटक : राजकीय विधान असलेलं नाटक

नाटकाचं दिग्दर्शन आलोक राजवाडेनं केलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने धर्मकीर्तीशी साधलेला संवाद..

(संग्रहित छायाचित्र)

चिन्मय पाटणकर

युवा लेखक धर्मकीर्ती सुमंतनं लिहिलेल्या ‘अ डाऊटफुल गेझ अ‍ॅट उबेर अ‍ॅट मिडनाइट’ या नव्या नाटकाचा प्रयोग २५ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता अक्षरनंदन शाळेत होणार आहे. नाटकाचं दिग्दर्शन आलोक राजवाडेनं केलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने धर्मकीर्तीशी साधलेला संवाद..

*    तू इंग्लंडमध्ये जाऊन संहिता लेखनाचा अभ्यास केलास. कसा होता अनुभव?

– इंग्लंडमधील ईस्ट अँगलिया विद्यापीठात मी संहिता लेखनाचा एक वर्षांचा अभ्यासक्रम केला. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकरांनी हे विद्यापीठ मला सुचवलं होतं. या अभ्यासक्रमासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली होती. अनुभवाविषयी सांगायचं, तर खूप फरक नाही जाणवला.. तिथला अभ्यासक्रम एफटीआयआयच्या जवळपास ५० टक्के सारखाच होता. गंमत म्हणजे, मी तिकडे गेलो तेव्हा तिथे शिक्षकांचा निवृत्तिवेतनासाठी संप सुरू होता. त्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा होता. पण चतुर्थश्रेणी कर्मचारी व्यवस्थितपणे काम करत होते. त्यांचा संपाशी संबंध नव्हता. त्यातून एक विरोधाभास पाहायला मिळाला. सुरुवातीला वर्गात शिकवलंच जात नव्हतं. त्यामुळे वातावरण जरा बिघडलेलं होतं. शिक्षणासाठी कर्ज वगैरे घेऊन आलेले विद्यार्थी अस्वस्थ होते. वर्गाऐवजी एका चौकात जे शिकवलं जात होतं, त्यातून बरच वेगळं आणि मोकळं वातावरण पाहता-अनुभवता आलं. मात्र, या पलीकडे जाऊन विचार केला, तर या अभ्यासक्रमामुळे मला काही नव्या लेखकांची ओळख झाली, नव्या नाटकांचा अभ्यास करायला मिळाला. त्याबाबत शिक्षकांबरोबरच झालेली चर्चा मार्गदर्शक होती. या दरम्यान काही नवे मित्रही झाले. त्यांच्याशी झालेल्या संवादातून बऱ्याच वेगळ्या गोष्टी समजून घेता आल्या.

*    ‘अ डाऊटफुल गेझ अ‍ॅट उबेर अ‍ॅट मिडनाइट’ हे नाटक नेमकं काय आहे?

– त्याच एक वर्षांच्या अभ्यासक्रमातील ‘मोनोलॉग एक्सरसाइज’मधून हे नाटक घडलं आहे. एक तरुण उबेरच्या चालकाला पत्ता सांगतोय. पण पत्ता सांगताना तो इतका वेगळ्या स्तरावर जातो, की आपल्यापुढे काही वेगळ्याच गोष्टी येतात. मूळ कल्पना एकल नाटय़ाची होती. मात्र, नंतर त्यात एका फुगेवाल्या मुलीची व्यक्तिरेखा वाढली. ती कल्पना आलोक राजवाडेनं सुचवली. या नाटकातून भारतातील सध्याची सामाजिक-राजकीय-आर्थिक अस्वस्थ परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामाजिक-राजकीय विधान या नाटकात केलं आहे. यात सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री भागडे यांच्या भूमिका आहेत. तर साकेत कानेटकरने संगीत, सत्यजित शोभा श्रीराम यांनी प्रकाशयोजना, हृषीकेश नागावकर, रवी चौधरी यांनी नेपथ्य केलं आहे.

*    तुला त्या अभ्यासक्रमादरम्यान काय जाणवलं? त्यांचा भारतातल्या नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?

– तिथं नाटकाचं वातावरण खूप चांगलं आहे. मी तिथे शिकायला असताना स्टीव्ह वॉटर्स या प्राध्यापकाने ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, सतीश आळेकरांची नाटकं, सत्यजित रे यांचे चित्रपट पाहिले, त्याचा अभ्यास केला. तिथले अनेक प्राध्यापक भारतात येऊन काम करून गेलेले होते. प्राध्यापक राल्फ येलो यांनी आळेकरांची नाटकं दिग्दर्शित केलेली होती. भारतातल्या डाव्या चळवळीतून आलेली जी नाटकं आहेत, त्यांचा तिकडे बऱ्यापैकी प्रभाव आहे. भारतातल्या नाटकाविषयी तिकडे आदर आहे, असं जाणवलं.

*    तुझ्या आतापर्यंतच्या नाटकांत भरपूर व्यक्तिरेखा असतात, पण या नाटकात दोनच आहेत. त्या शिवाय हे नाटक हिंदीत आहे. तुला स्वत:ला या नाटकाबद्दल काय वाटतं?

– ‘नाटक नको’ या माझ्या नाटकानंतर माझं नाटक खूप आत्मकेंद्रित आहे असं म्हटलं जातं होतं. त्यामुळे माझ्यापलीकडे जाऊन काहीतरी विचार करावासा वाटू लागला. त्यामुळे मी ज्या पद्धतीने जगाकडे बघतो, तसंच नाटकात मांडता येईल का, अशी कल्पना सुचली. मग त्या दृष्टीनंच लिहायचं ठरवलं. गोव्यातल्या सेरेनडिपिटी आर्ट फेस्टिव्हलनं या नाटकाची निर्मिती केली आहे. त्यांना नाटक हिंदी किंवा इंग्रजीतून हवं होतं, म्हणून ते हिंदीतून लिहिलं. तसं मी थोडंफार हिंदी बोलत, वाचत असल्याने हिंदी अवघड नव्हतं. पण वाचणं आणि बोलणं यात फरक पडतो. त्यामुळे साहित्यिक हिंदी टाळून साधं सोपं, बोलीभाषेतलं हिंदी नाटकात आहे. स्वत:शी प्रामाणिक झाल्यानं नाटक अधिक मोकळं झालं, असं मला वाटतं.

First Published on May 23, 2019 12:22 am

Web Title: natak bitak article on political statement drama